आजची कर्जमाफीची घोषणा म्हणजे लबाडाघरचं आवतान, शेतकऱ्यांना गंडवलं ; उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर जोरदार टीका


मुंबई : राज्याचा बळीराजा ज्या घोषणेकडे आतुरतेने डोळे लावून बसला होता. ती घोषणा अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली. अर्थसंकल्पात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीची योजना जाहीर केली. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. सरकारची ही योजना हे लबाडाघरचं आवतान आहे. सरकारनं शेतकऱ्यांना गंडवलं असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना कृषी आणि ग्रामीण विकासाला केंद्रस्थानी ठेवत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा त्यांनी केली. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, फडणवीस सरकारची 2017 सालची छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना अजूनही सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनो हे लबाडाघरचं आवतान आहे. शेतकरी कर्जमाफीची योजना कधीपर्यंत पूर्ण करणार? हे फडणवीस यांनी का सांगितले नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, सरकारने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन का पूर्ण केले नाही? ही पण योजना 2047 पर्यंत घेऊन जाणार का? आम्ही कालबद्ध पद्धतीने योजना राबवली. तुम्ही सातबारा कोरा करणार होतात त्याचे काय झाले? असे अनेक प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले आहेत.

दरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या अर्थसंकल्पावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.आज राज्य सरकारकडून दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. मात्र कमीत कमी पाच लाखांपर्यंतच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे होती असे त्यांनी म्हटले आहे.


 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!