उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस, उरले फक्त काही तास, उमेदवारीसाठी वेटिंगवाले टेन्शनमध्ये.. नेमकं काय घडणार?

पुणे : राज्यात काही ठिकाणी पाच वर्षानंतर तर काही ठिकाणी त्याहून अधिक काळाने महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. राज्यातील मुंबईसह एकूण २९ महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे सर्वच आजीमाजी नगरसेवकांनी आणि इच्छुकांनी उमेदवारी मिळावी म्हणून फिल्डिंग लावली आहे.
काहींना उमेदवारी मिळाली आहे. तर काहींना अद्यापही उमेदवारी मिळाली नाही. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने आज वेटिंगवाल्यांना प्रचंड टेन्शन आलं आहे. तर काही लोकांना युती किंवा आघाडी होते की नाही याचं टेन्शन आलं आहे.
मुंबईसह अनेक शहरांमध्ये उमेदवारांची सकाळपासूनच धावपळ सुरू आहे. एबी फॉर्म मिळवण्यासाठी नेत्यांच्या गाठीभेटी, फोनाफोनी आणि शक्तीप्रदर्शन सुरू असून युती-आघाडीच्या निर्णयामुळे काही ठिकाणी नाराजी तर काही ठिकाणी गोंधळाचं वातावरण आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत येत असताना राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे.

निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची आज शेवटची तारीख असून अद्यापही कित्येकांना एबी फॉर्म न मिळाल्याने धाकधूक वाढली आहे. मुंबईत आज दुपारी ३ पर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असून उर्वरित मनपांमध्ये अर्ज स्वीकारण्याची वेळ संध्यकाळी ५ पर्यंत आहे.

याच दरम्यान आमदार विद्या ठाकूर यांना मोठा झटका बसला असून त्यांचा मुलगा आणि विद्यमान नगरसेवक दीपक ठाकूर यांची उमेदवारी कापण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणामुळे वॉर्ड बदलाचा प्रयत्न फसला असून अखेर भाजपने वॉर्ड क्रमांक ५० मधून विक्रम राजपूत यांना उमेदवारी दिली आहे. पुण्यात शिवसेनेत रात्री उशिरापर्यंत खलबतं सुरू होती.
सुरुवातीला स्वबळाची तयारी करत ६० हून अधिक इच्छुकांना एबी फॉर्म देण्यात आले, मात्र ऐनवेळी युतीचा निर्णय झाल्याने फॉर्म माघारी घेण्यात आल्याने सेनेत नाराजी वाढली आहे.
