*पद्मश्री डॉ.बी.व्ही. राव यांचा आज जयंती दिवस ! पोल्ट्री व ब्रीडर्स असोशिएशनच्या वतीने चिकन जनजागृती अभियानाचे आयोजन…!
पुणे : राष्ट्रीय चिकन दिनानिमित्त पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशनच्या वतीने १६ व १७ नोव्हेंबर २०२३ या दोन दिवशी देशभर जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. पुण्यासह नाशिक, रायगड, पालघर व इतर जिल्ह्यांतील अनेक दुकानांतून सवलतीच्या दरात ग्राहकांना चिकन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
भारतीय कुक्कुटपालनाचे जनक पद्मश्री डाॅ. बी. व्ही. राव यांच्या जन्मदिनानिमित्त १६ नोव्हेंबर राष्ट्रीय चिकन दिवस (नॅशनल चिकन डे) साजरा करण्यात येतो. फर्ग्युसन रस्त्यावरील वेंकीज एक्प्रेसमध्ये चिकनच्या खास डिशेशचे सादरीकरण करण्यात आले. तसेच सवलतीच्या दरात चिकन विक्री व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्यदायी चिकनविषयीची माहिती दिली.
अखिल भारतीय ब्रॉयलर समन्वय समितीचे संयोजक व पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष वसंतकुमार शेट्टी, पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष संजय नाळगिरकर, सचिव डॉ. अजय देशपांडे, विश्वस्त कृष्णचरण यांनी दिवसाचे महत्व सांगितले. असोसिएशनचे संकल्प कुलकर्णी, संजय थोपटे, वेंकीजचे ऑपरेशन मॅनेजर किरण गुंजाळ आदी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रसह कर्नाटक, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेश राज्यातदेखील साजरा होत आहे.
वसंतकुमार म्हणाले, “सामान्य नागरिकांमध्ये चिकनबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येत आहे. पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशन महाराष्ट्र, कर्नाटक पोल्ट्री फार्मर्स ब्रीडर्स असोसिएशन, पश्चिम बंगाल पोल्ट्री फेडरेशन तसेच इतर अनेक राज्य पोल्ट्री असोसिएशनतर्फे देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वस्त दरात चिकन विक्री, जागृतीपर कार्यक्रम, व्याख्यान, प्रात्यक्षिके, प्रशिक्षण अशा विविध उपक्रमांचे आयोजन या जागृती अभियानात करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील विविध भागात साधारण १५० दुकानात सवलतीच्या दरात चिकन विक्री सुरू आहे.”
पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशन अर्थात कुक्कुट पालक-शेतकरी आणि उत्पादक संघ महाराष्ट्र, ही संस्था गेल्या दोन दशकांपासून कुक्कुट पालक-शेतकरी आणि उत्पादकांच्या हितासाठी कार्यरत आहे. जवळपास १०० हून अधिक कुक्कुट पालक-शेतकरी आणि उत्पादक संस्थेचे सभासद आहेत. संस्थेच्या सभासदांकडुन एकत्रितपणे महिन्याला साडेचार कोटी ब्राॅयलर प्लेसमेंट केली जातात. जवळपास गेली दोन दशके संस्था, अव्याहतपणे कुक्कुट पालक शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचे काम करत आहे. राज्य तसेच केंद्र सरकारपुढे सभासदांचे प्रतिनिधित्व संस्था करते, असे संकल्प कुलकर्णी यांनी नमूद केले.