पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सर्व प्रमुख रस्ते अतिक्रमण मुक्त करा; आमदार राहुल कुल यांची विधानसभेत आग्रही मागणी…


पुणे:  शहर आणि परिसरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहराला जोडणारे सर्व मुख्य रस्ते तातडीने अतिक्रमण मुक्त करावेत आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर कडक कारवाई करावी, अशी आग्रही मागणी आमदार राहुल कुल यांनी आज विधानसभेत केली.

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सुरू असलेले रिंग रोड आणि एलिव्हेटेड कॉरिडॉरचे प्रकल्प एका निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याची गरजही त्यांनी यावेळी अधोरेखित केली.

विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे पुण्यातील वाहतूक व्यवस्थेवर चर्चा करताना आमदार कुल बोलत होते. यावेळी त्यांनी पुणे शहराच्या भविष्यातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या प्रकल्पांकडे सरकारचे लक्ष वेधले.

पुणे शहरात प्रवेश करणारे आणि शहराला जोडणारे सर्व प्रमुख रस्ते सध्या अतिक्रमणांच्या विळख्यात आहेत. विशेषतः अनधिकृत फेरीवाल्यांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून, पादचारी आणि वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. हे रस्ते तातडीने मोकळे करण्यासाठी संबंधित महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला कडक आदेश देण्याची मागणी त्यांनी केली.

‘एमएसआरडीसी’ मार्फत राबवण्यात येणारा आउटर रिंग रोड, ‘पीएमआरडीए’चा इनर रिंग रोड आणि पुणे-नगर तसेच पुणे-सोलापूर महामार्गावरील प्रस्तावित एलिव्हेटेड कॉरिडॉर हे प्रकल्प पुण्यासाठी जीवनदायी ठरणार आहेत. हे प्रकल्प केवळ कागदावर किंवा निविदा प्रक्रियेत न रेंगाळता, ते वेळेत पूर्ण होण्यासाठी विशेष यंत्रणाउभी करावी, असे त्यांनी नमूद केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार फेरीवाला धोरण राबवून अधिकृत झोन निश्चित करावेत, जेणेकरून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, या मुद्द्यावरही त्यांनी भर दिला.

आमदार राहुल कुल यांच्या प्रश्नावर उत्तर देताना संबंधित मंत्र्यांनी स्पष्ट केले की, पुण्याच्या रिंग रोडच्या कामांना राज्य सरकारने प्राधान्य दिले आहे. तसेच, वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्यासाठी आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पुणे महानगरपालिका आणि ट्रॅफिक पोलिसांना विशेष सूचना दिल्या जातील, असे आश्वासनही सरकारतर्फे देण्यात आले.

पुणेकरांचा रोजचा प्रवास सुखकर व्हावा आणि वेळेची बचत व्हावी, यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत, असा विश्वास आमदार राहुल कुल यांनी यावेळी व्यक्त केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!