वाहतुक दंड निपटारा करण्यासाठी पुणेकरांना संधी! या कालावधीसाठी लोकअदालीचे आयोजन..!!
पुणे : वाहतूक नियमभंगाच्या थकीत दंड प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी ५ मे २०२४ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांच्या वतीने जिल्हा न्यायाधीश, मोटार वाहन न्यायालय, शिवाजीनगर व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त यांच्या समवेत बैठक घेण्यात आली आहे.
या बैठकीमध्ये शुक्रवारपासून (दि.५) येरवडा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात प्रलंबित वाहतूक चलनांच्या तडजोडीनंतर दंडातील सवलीबाबत माहिती देण्यासाठी ‘जिल्हा हेल्प डेस्क’ सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाहनचालकांनी येरवडा येथील वाहतूक उपायुक्त कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ५ मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकअदालतीमध्ये प्रलंबित खटले तडजोडीने मार्गी लावण्यात येणार आहेत. वाहतूक नियमभंगाच्या थकीत दंडाचे प्रमाण जास्त आहे. थकीत दंडाची रक्कम कमी करणे, तसेच वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यासाठी पुणे वाहतूक शाखेकडून जिल्हा हेल्प डेस्क सुरू करण्यात आला आहे. वाहनचालक/मालक यांनी या सुविधेचा लाभ घेऊन तडजोडीत दंड कमी करुन घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
येरवडा येथील वाहतूक शाखेच्या उपायुक्त कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या जिल्हा हेल्प डेस्कचे कामकाज शासकीय सुट्टी सोडून सकाळी ११ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार आहे. प्रलंबित खटला, थकीत दंडाची रक्कम कमी करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येणार आहे. वाहनचालकांना दंडाच्या रक्कमेतून सूट देण्यात येणार आहे