रेल्वेवर वारंवार होणाऱ्या दगडफेकीवर नियंत्रणासाठी लोणी काळभोर, उरुळीकांचनसह पुणे विभागातील रेल्वे मार्गांवर संरक्षक भिंती बांधण्यात येणार…!
उरुळी कांचन : पुणे विभागात मागील काही दिवासांपासून रेल्वेवर दगडफेकीच्या घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर व प्रवास्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून रेल्वे प्रशासनाने लोणी काळभोर, उरुळी कांचनसह पुणे विभागात रेल्वे मार्गांच्या दोन्ही बाजूंना संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान पुणे विभागातर्गंत पुणे-लोणावळा, मिरज आणि दौंड असे तीन मार्ग आहेत. या मार्गांवर दररोज दोनशेपेक्षा अधिक ट्रेन धावतात. पण, ग्रामीण भागातील रेल्वे रूळाच्या बाजूंना संरक्षण भिंत नसल्याने नागरिक किंवा पाळीव प्राणी रेल्वे रूळ ओलडतांना अपघात होतात.या अपघातामध्ये बऱ्याचवेळा जीवित आणि वित्तहानी होते. तसेच धावत्या रेल्वेवर दगडफेकीच्या घटना देखील घडतात.
यापूर्वी पुणे विभागात धावत्या रेल्वेवर वर्षभरात ३० दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशा घटनांचे “हॉटस्पॉट’ असलेल्या ठिकाणी रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूंना संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. तसेच भिंतीच्या कामालाही सुरुवात झाली आहे, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
याबाबत बोलताना पुणे रेल्वे विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे म्हणाले की, रेल्वेवर दगडफेक वाढत असल्याचे लक्षात घेऊन रेल्वेमार्गाच्या बाजूने भिंत उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात १० किलोमीटर लांबीची भिंत उभारण्यास मान्यता मिळाली आहे. त्यासाठी निधीही मिळाला असून, काही ठिकाणी काम हाती घेण्यात आले आहे.
पुणे विभागातील दगडफेकीची ठिकाणे : घोरपडी, मांजरी, लोणी काळभोर, उरुळी कांचन, यवत, कराड, तळेगाव दाभाडे, पिंपरी, चिंचवड, कासारवाडी, आकुर्डी आणि शिवाजीनगर आदी भागात दगडफेरीच्या घटना सातत्याने घडत असतात.