पुणेकरांना दहीहंडी साजरी करायला वेळेची मर्यादा, जाणून घ्या नियम आणि अटी…
पुणे : पुणेकरांना आता दहीहंडी उत्सव रात्री १०वाजेपर्यंतच साजरा करता येणार आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालय आणि राज्य सरकारच्या आदेशाचे पालन करण्यात येईल, असे शहर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याआधी शहरातील काही सार्वजनिक मंडळांनी दहीहंडी उत्सवाला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी देण्याची मागणी केली होती.
पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत डॉल्बीच्या वापराला बंदी आहे. तर राज्य सरकारकडून दहीहंडी उत्सवासाठी वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय झालेला नाही आहे.
यामुळे मंडळांना गोकूळ अष्टमीच्या दिवशी गुरुवारी (ता.७) दहीहंडीचा उत्सव रात्री दहा वाजेपर्यंतच साजरा करावा लागणार आहे. तसेच दहीहंडी साजरी करण्याबाबत मंडळांना सर्वोच्च न्यायालय आणि राज्य सरकारच्या आदेशाचे पालन करावे लागणार आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्त्यावर दरवर्षीप्रमाणे यंदा विविध दहीहंडी उत्सव मंडळांकडून दहीहंडी साजरी केली जाणार आहे.
त्यामुळे मजुर अड्डा चौक (बुधवार चौक) ते दत्तमंदिर चौक, बेलबाग चौक ते सेवासदन चौक, मजुर अड्डा चौक ते अप्पा बळवंत चौक, महात्मा फुले मंडई, महाराष्ट्र साहित्य परिषद, नवी पेठ या ठिकाणी होणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पुण्यात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते.