दिल्ली स्फोटाचा थरारक तपास! रिसिन विष, महिला डॉक्टरकडे रायफल; एकाच हॉस्पिटलमधले चार डॉक्टर्स, दिल्ली स्फोटाशी त्यांचं काय कनेक्शन?

नवी दिल्ली : दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी शक्तीशाली स्फोट झाला. या स्फोटाने दिल्ली हादरली. संध्याकाळी 6:52 मिनिटांनी शक्तीशाली स्फोट झाला. यात ९ जणांचा मृत्यू झाला. २० जखमी आहेत.

स्फोट इतका शक्तीशाली होता की, आसपासचा परिसर हादरला. परिसरात एकच गडबड, गोंधळाची स्थिती होती. i20 कारमध्ये हा स्फोट झाल्याचं तपासातून समोर आले आहे.

घटनेच्या ३ तास आधी ही कार सुनहरी मशिदीजवळ उभी होती. स्फोटानंतर तपास करणाऱ्या दिल्ली स्पेशल सेलच्या हाती काही महत्वाचे पुरावे लागले आहेत. त्यावरुन हा स्फोट आत्मघातकी दहशतवादी हल्ला असल्याचे संकेत मिळत आहेत.

स्फोटानंतर दिल्ली स्पेशल सेल आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा यांनी तपासाची सूत्रं हाती घेतली आहेत. या तपासात जे काही समोर आलं आहे, त्यानं पोलिसांसह संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलंय, कारण या स्फोटाशी एका हॉस्पिटलमधील चार डॉक्टरांचं नाव जोडलं गेलं आहे.
स्फोटाच्या काही तास आधी जम्मू-काश्मीर आणि फरीदाबाद पोलिसांनी संयुक्त कारवाई केली होती. या कारवाईत 2,900 किलो IED बनवणारे केमिकल्स, शस्त्रं आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. या ऑपरेशनदरम्यान जैश-ए-मोहम्मद आणि अंसर गजवात-उल-हिंद या संघटनांशी संबंधित आंतरराज्यीय दहशतवादी नेटवर्कचा मोठा पर्दाफाश झाला.
या संपूर्ण तपासात चार डॉक्टरांचं नाव समोर आलं आहे – डॉ. आदिल अहमद राठर, डॉ. शाहीन शाहिद, डॉ. अहमद मोहियुद्दीन सैयद, आणि डॉ. मुझमिल शकील. हे चारही डॉक्टर्स वेगवेगळ्या राज्यांत कार्यरत असून, त्यांचं एकमेकांशी दहशतवादी नेटवर्कद्वारे संपर्क असल्याची माहिती समोर येते आहे.
पहिली अटक अनंतनाग (जम्मू-काश्मीर) येथे झाली. तिथे पोलिसांनी मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर आदिल अहमद राठरला अटक केली. त्याच्या लॉकरमध्ये पोलिसांना AK-47 रायफल आणि स्फोटक साहित्य सापडलं. तपासात समोर आलं की, राठरचा संबंध जैश-ए-मोहम्मद आणि अंसर गजवात-उल-हिंदशी आहे.
दुसरी धक्कादायक अटक झाली फरीदाबादमध्ये. लखनऊची महिला डॉक्टर शाहीन शाहिद, जी अल-फलाह यूनिवर्सिटीमध्ये कार्यरत होती, तिच्या कारमधून “कॅरोम कॉक” नावाची असॉल्ट रायफल सापडली. ही रायफल अत्यंत प्रगत प्रकारातील असून, स्फोटक हल्ल्यांसाठी वापरली जाते. पोलिस सध्या शाहीनचा या नेटवर्कमध्ये नेमका काय रोल होता, हे शोधत आहेत. तिचं नाव जाहीर केलं गेलेलं नसले तरी प्राथमिक तपासात ती नेटवर्कचा कम्युनिकेशन लिंक असल्याचं सूचित होतं आहे.
तिसरी अटक झाली गुजरात एटीएसकडून. डॉ. अहमद मोहियुद्दीन सैयद, हा हैदराबादचा रहिवासी डॉक्टर चीनमध्ये शिक्षण घेतल्यानंतर भारतात परतला होता. त्याच्याकडे तपासात ‘रिसिन’ नावाचं अत्यंत घातक विष तयार करण्याचं पुरावे मिळाले आहेत. रिसिन हे विष इतकं घातक आहे की, काही मिलीग्रॅममधूनही मृत्यू होऊ शकतो.
अहमद सैयदने दिल्ली आजादपूर मंडी, अहमदाबादचं नरोडा फ्रूट मार्केट आणि लखनऊतील आरएसएस कार्यालय यांसारख्या गर्दीच्या ठिकाणांची रेकी केल्याचं समोर आलं आहे. यावरून तो संभाव्य दहशतवादी हल्ल्यांची तयारी करत होता, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
चौथी अटक झाली १० नोव्हेंबर रोजी फरीदाबादमध्ये. अल-फलाह यूनिवर्सिटीमध्ये शिकवणारा काश्मिरी डॉक्टर डॉ. मुझमिल शकील याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे ३६० किलो अमोनियम नायट्रेट सापडले हे स्फोटक तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन आहे.
फरीदाबाद पोलिसांनी सांगितलं की, मुझमिलच्या दुसऱ्या ठिकाणावर छापा मारल्यावर २५६३ किलो स्फोटक सामग्री जप्त करण्यात आली. त्याचे संबंध थेट जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनेशी असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.
