पुण्यात अपघाताचा थरार! मध्यरात्री भरधाव कार 170 ते 200 फूट दरीत कोसळली, दोघेजण गंभीर जखमी

पुणे : राजगड तालुक्यातील पाबे घाटात मध्यरात्रीच्या सुमारास कार 170 ते 200 फुट दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, राजगडच्या पाबे घाटातून मध्यरात्रीच्या दोनच्या सुमारास शुभम सचिन अजेटराव आणि अमित सचिन अजेटराव हे कारने रात्री उशिरा वेल्हेहून पाबे खिंडी मार्गे पुण्याकडे निघाले होते. घाट चढत असताना एका तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार थेट खोल दरीत कोसळून हा अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच वेल्हे पोलिस ठाण्याचे कर्मचारी आकाश पाटील यांनी तत्काळ आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती कळवली. त्यानंतर पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरू केलं. दरीत अडकलेल्या जखमींना मोठ्या प्रयत्नांनी स्ट्रेचरच्या साह्याने बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे.
