लोणी काळभोर हादरलं! एकाच रात्रीत तीन वेगवेगळे भीषण अपघात; दोन ठार, तीन जखमी

लोणी काळभोर : लोणी काळभोर व कुंजीरवाडी येथे दोन अपघात झाल्याची घटना पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील घडली आहे. तर हडपसर सासवड रस्त्यावरील वडकी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील दिवे घाटात एक अपघात झाला आहे. असे एकूण तीन अपघात झाले आहेत. या तीन वेगवेगळ्या अपघातात दोन जणांचा मृत्यू, तर तीन जण जखमी झाले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
पहिल्या घटनेत, भागवत आत्माराम काळे (वय ३८ धंदा ड्रायव्हर रा. कोल्हापुरी हॉटेलचे पाठीमागे, माळी मळा, लोणी काळभोर ता. हवेली), चंद्रकांत मोराळे व रमेश शिरगीरे हे तिघेजण मित्र आहेत. हे तिघेजण लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरात असलेल्या राजेद्र हॉटेलमध्ये जेवणासाठी दुचाकीवरून जात होते.
दरम्यान, राजेंद्र पेट्रोल पंपाचे समोरील रस्ता दुभाजक ओलांडुन पुढे जात असता हडपसरकडुन सोलापूर च्या दिशेकडे चाललेल्या इन्होवा कारने दुचाकीला बुधवारी (ता. १९) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास जोरदार धडक दिली. या अपघातात तिघेजण जखमी झाले आहे. त्यांना लोणी काळभोर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा परिसरात स्विफ्ट गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली आहे. या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला आहे. विकास रामदास धुमाळ (वय-३९, धुमाळ मळा, कुंजीरवाडी, ता.हवेली) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
तिसऱ्या घटनेत, पुणे सासवड रस्त्यावरील वडकी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील महालक्ष्मी वजनकाटा परिसरात एका दुचाकी चालकाला अज्ञात वाहनाने बुधवारी (ता.१९) रात्री साडे आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास जोरदार धडक दिली. या अपघातातही दुचाकी चालक रवींद्र देवकर याचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, थेऊरफाटा आणि वडकी येथील दोन्ही अपघातात दोन दुचाकी चालकाचा मृत्य झाला आहे. तर माळीमळा येथील अपघातात तिघे जन जखमी झाले आहेत. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु आहे.