मोठी बातमी! तीन विद्यार्थिनींच्या धावत्या ऑटोतून उड्या, एकीचा मृत्यू, घटनेने उडाली खळबळ..

हिंगोली : धावत्या आटोतून तीन विद्यार्थिनींनी उडी मारल्याची धक्कादायक घटना हिंगोलीत घडली. या तीन विद्यार्थिनींपैकी पैकी एकीचा मृत्यू झाला असून दोघीजणी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.
ही घटना तालुक्यातील राहोली पाटी शिवारात शुक्रवारी दुपारी घडली. दरम्यान, तपासानंतरच घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेने नंतर एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, हिंगोलीत शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थीनी शुक्रवारी दुपारच्या सुमारास ऑटोतून नर्सी ना. कडे जात होत्या. हिंगोली ते नर्सी ना.मार्गावरील राहोली पाटी शिवारात ऑटो आला असता यातील एका विद्यार्थीनीने धावत्या ऑटोतून उडी मारली.
त्यामुळे घाबरलेल्या अन्य दोघींनीही उडी मारली. यात तिघींजणीही गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शामराव डोंगरे, जमादार सुधीर ढेंबरे,अस्लम गारवे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर तिघींनाही उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यातील एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमीपैकी एकीला उपचारासाठी नांदेड येथे रेफर करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, घटनेचे नेमके कारण? घटना कशी घडली? हे पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.