दुर्देवी ! केदारनाथ पायी मार्गावर डोंगरावरून ढिगारा पडल्याने तिघांचा मृत्यू!!
उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये रविवारी मोठी दुर्घटना घडली. येथे केदारनाथ पायी मार्गावर डोंगरावरून ढिगारा पडल्याने तिघांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. चिरबासाजवळ हा अपघात झाला. ये-जा करणाऱ्यांनी तात्काळ स्थानिक प्रशासनाला माहिती दिली. यानंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचली आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, चिरबासाजवळ दरड कोसळल्याची माहिती आहे. या अपघातात काही प्रवाशांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची बातमी आहे. अपघातातील काही जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी गोंधळाचे वातावरण आहे. दरड कोसळल्याने फूटपाथ पूर्णपणे बंद झाला आहे. चालण्याच्या मार्गावर मोठमोठे दगड पडलेले आहेत. हा मार्ग केवळ पादचाऱ्यांसाठी असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या मार्गावर चारचाकी वाहने धावत नाहीत.
बचाव पथक रस्त्यावरील ढिगारा हटवण्यात व्यस्त आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, डोंगरावरून अचानक मोठे दगड पडू लागले. कोणालाही सावरण्याची संधीही मिळाली नाही. 8-10 लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. यापैकी ३ जणांचा मृत्यू झाला. या अपघातावर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे, मी यासंदर्भात अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे.