हवेली तालुक्यातील तीन लाचखोर महिला तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात, महसूल विभागात मोठी खळबळ…

पुणे : पश्चिम हवेलीतील सांगरूण,बहुली व खडकवाडी-कुडजे या गावातील तीन महिला तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात एकाचवेळी अडकल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

तसेच एका महिला तलाठ्याला २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. तिन्ही महिला तलाठ्यांवर खडक पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे हवेली महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

शारदादेवी पुरूषोत्तम पाटील (वय ४० ,तलाठी खडकवाडी कुडजे, हवेली, पुणे रा.ठि. सर्व्हे न. 57/1, कृष्णकुंज सोसायटी, मोरे वस्ती, सोलापूर रोड, पुणे मांजरी बुद्रुक ) असे रंगेहाथ लाच स्वीकारलेल्या महिला तलाठ्याचे नाव आहे.

प्रेरणा बबन पारधी (वय. ३०, तलाठी सांगरूण, हवेली पुणे रा ठि. फ्लॅट न. 7s, 2/4A, जी सोसायटी, गुलमोहर पार्कजवळ, पाषाण, पुणे) व दिपाली दिलीप पासलकर (वय.२९ , तलाठी बहुली,हवेली, पुणे रा.ठि. लेन न.4, स्वामी समर्थनगर, कोंढवा, काकडेनगर, पुणे 48) या दोन महिला तलाठ्यांवर लाचेच्या मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी एका 42 वर्षीय पुरुषाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. हस्तलिखित सातबारा, संगणकीकृत सातबारा व आठ अ उतारा यासाठी शासकीय शुल्काच्या व्यतिरिक्त लाचेची मागणी केल्याचे उघडकीस आले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांना सांगरून, बहुली, खडकवाडी आणि कुडजे (ता.हवेली) या गावाच्या हद्दीतील जमीन खरेदी विक्री करण्यासाठी पुणे शहराच्या लगतच्या प्रस्तावित रिंग रोड मध्ये अधिग्रहित झालेल्या जमिनीच्या सातबारा तसेच आठ अ उताराचे संगणकीकृत तसेच हस्तलिखित साक्षांकित प्रत हव्या होत्या.
त्यासाठी ते सांगरूण येथे कार्यरत असलेल्या तलाठी प्रेरणा पारधी, बहुली येथील तलाठी दिपाली पासलकर व खडकवाडी कुडजे येथील तलाठी शारदा देवी पाटील यांना भेटले. त्यावेळी सांगरुण गावातील तक्रारदार यांना आवश्यक असलेल्या सातबाराच्या व आठ अ उताऱ्याच्या 240 प्रतीसाठी तलाठी पारधी यांनी सरकारी फी व्यतिरिक्त 16,400 रुपयाची लाचेची मागणी केली होती.
बहुली गावातील आवश्यक असणाऱ्या सातबाराच्या व उताऱ्याच्या आवश्यक असणाऱ्या 106 प्रतिसाठी संबंधित गावचे तलाठी दिपाली पासलकर यांनी शासकीय शुल्काच्या व्यतिरिक्त 4 हजार 910 रुपयांची लाच मागितली होती. खडकवाडी व कुडजे गावातील तलाठी शारदा देवी पाटील यांनी सातबाराच्या व उताऱ्याच्या एकूण 32 प्रतिसाठी सरकारी शुल्काच्या व्यतिरिक्त 1520 रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने, 19 सप्टेंबरला पडताळणी केली असता, खडकवाडी कुडजे येथील शारदादेवी पाटील यांना सातबाराच्या व आठ अ उताऱ्याच्या 32 प्रतिसाठी सरकारी फी रक्कम 480 रुपये होत असताना, पाटील यांनी तक्रारीपूर्वी तक्रारदाराकडून 1 हजार 500रुपये स्वतःसाठी घेतल्याचे कबूल करून आणखी 2 हजार रुपयांच्या लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
शारदादेवी पाटील यांना हवेली तहसीलदार यांच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर तक्रारदाराकडून दोन हजार रुपयाची लाथ स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. सांगरूण गावाच्या प्रेरणा पारधी यांनी सातबाराच्या व उताऱ्याच्या 240 प्रतींसाठी 3 हजार 600 रुपये होत असताना, तक्रारदार यांच्याकडून तक्रारीपुर्वी 4 हजार रुपये स्विकारून आणखी 12 हजार 400 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
बहुली येथील तलाठी दिपाली पासलकर यांच्याकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता तक्रारदार यांना 106 सातबाराच्या व उताऱ्याच्या प्रती पाहिजे होत्या. त्यासाठी सरकारी फी 1 हजार 590 रुपये होत होते. परंतु, त्यांनी पासलकर यांनी तक्रारदाराकडे 6 हजार 500 होत असून सांगरूण गावाच्या तलाठी प्रेरणा पारधी यांच्याकडे ती रक्कम देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले आहे.
