यंदाचा उन्हाळा अधिक कडक, १० जिल्ह्यांमध्ये मोठ संकट, भारतीय हवामान विभागाचा थेट येलो अलर्ट…

पुणे : फेब्रुवारी महिन्यात हवामानात सतत बदल होताना दिसला. कधी थंडी तर कधी पाऊस अशी स्थिती होती. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच उष्णता वाढत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अनेक भागात थेट उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. दुपारच्यावेळी कडाक्याचे उन्ह आहे.

उकाडा प्रचंड वाढला आहे. अकोला आणि अमरावतीमध्ये उष्णतेच्या लाटेचा मोठा इशारा देण्यात आला. विदर्भात सूर्य आग ओकताना दिसत आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात आज उकाडा अधिक असेल. आज या भागात उष्णतेचा येलो अलर्ट दिला आहे. कोकणात दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. आज दिवसभर तापमानात चढउतार बघायला मिळेल.
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने आज दमट आणि उष्ण हवामानाचा येलो अलर्ट जारी केला आहे. पूर्व दिशेकडून उष्ण वारे कोकणाकडे वाहण्यास सुरुवात झाल्याने महामुंबईला पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईत हवामान उष्ण राहील.

यंदाचा उन्हाळा अधिक कडक…
यंदाचा उन्हाळा देशासाठी अधिक तापदायक ठरण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. प्रशांत आणि हिंदी महासागरातील बदलत्या समुद्री परिस्थितीचा परिणाम यावर्षीच्या तापमानावर होणार असल्याचे ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सध्या विषुववृत्तीय प्रशांत महासागरात ‘ला निना’ ही हवामान स्थिती कमकुवत होत असल्याचे निरीक्षण आहे. मध्य आणि पूर्व प्रशांत महासागराच्या अनेक भागांत समुद्रपृष्ठाचे तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदवले गेले आहे. हवामान मॉडेल्स तसेच ‘एमएमसीएफएस’ च्या अंदाजानुसार, आगामी महिन्यांत ‘ला निना’चा प्रभाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हिंदी महासागरात ‘इंडियन ओशन डायपोल’ सध्या तटस्थ अवस्थेत असून, पुढील हंगामातही त्यात मोठा बदल होण्याची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या उन्हाळ्यात तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहू शकते. पूर्व व पूर्व-मध्य भारत, दक्षिण द्वीपकल्पातील अनेक भाग तसेच वायव्य आणि पश्चिम-मध्य भारतातील काही प्रदेशांत उष्णतेच्या लाटांचे दिवस सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. मात्र, वायव्य आणि मध्य भारतातील काही भागांत तापमान सरासरी किंवा त्यापेक्षा किंचित कमी राहू शकते.