सोनं-चांदी घेण्याचा विचार करताय? तर जरा थांबा, महत्वाची माहिती आली समोर, खरेदी आधी जाणून घ्या…

पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे.

त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. आज पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
जागतिक बाजारातील अस्थिरता आणि डॉलरमधील चढउतारामुळे देशांतर्गत बाजारात मौल्यवान धातूंच्या किमती सातत्याने वाढताना दिसत आहेत. मंगळवार, 27 जानेवारी रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. 5 फेब्रुवारी 2026 रोजी एक्सपायरी असलेले सोन्याचे फ्युचर्स प्रति 10 ग्रॅम 1 लाख 58 हजार 674 रुपयांवर उघडले होते.

मागील व्यवहार दिवशी सोनं 1 लाख 56 हजार 037 रुपयांवर बंद झाले होते. सकाळी 9 वाजून 55 मिनिटांच्या सुमारास हे दर 1 लाख 58 हजार 310 रुपयांपर्यंत पोहोचले होते, तर सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याने 1 लाख 59 हजार 820 रुपयांचा उच्चांक गाठला.
सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही आज मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. MCX वर 5 मार्च 2026 रोजी एक्सपायरी असलेली चांदी प्रति किलो 3 लाख 56 हजार 661 रुपयांवर व्यवहार करत होती. गेल्या आठवड्यातील बंद भावाच्या तुलनेत चांदीत जवळपास 21 हजार रुपयांची वाढ दिसून आली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात चांदीने 3 लाख 59 हजार 800 रुपयांचा उच्चांक गाठला असून, यामुळे औद्योगिक वापरासोबतच गुंतवणूकदारांच्याही खरेदी खर्चात मोठी वाढ झाली आहे.
बाजारातील अनिश्चितता, महागाईचा दबाव आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढल्यामुळे सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. येत्या काळातही या दरांमध्ये चढ-उतार कायम राहण्याची शक्यता असून, खरेदीचा निर्णय घेताना ग्राहकांनी योग्य नियोजन करण्याचा सल्ला दिला जात आहे.
देशातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,62,100 रुपये असून 22 कॅरेटसाठी 1,48,600 रुपये आणि 18 कॅरेटसाठी 1,21,610 रुपये दर आहेत. मुंबईमध्ये 24 कॅरेट सोनं 1,61,950 रुपये, 22 कॅरेट 1,48,450 रुपये आणि 18 कॅरेट 1,21,460 रुपयांवर पोहोचले आहे.
