अपघात रोखण्यासाठी मास्टर प्लॅन, ‘ती’ चूक करण्याआधी विचार करा, मुंबई-पुणे मार्गावर जाणार असाल तर बातमी तुमच्यासाठी…

पुणे : रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात असून रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. अपघात कमी करण्यासाठी लेझर स्पीड कॅमेऱ्यांचा पायलट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

वेगमर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या चालकावर कारवाई करण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. रोड सेफ्टी आणि ग्लोबल सेफ्टी पार्टनरशिप यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
या पायलट प्रकल्पाची अंमलबजावणी लोणावळा आणि वडगाव मावळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आली आहे. जुन्या मुंबई–पुणे महामार्गासह काही महत्त्वाच्या ठिकाणी टू-कॅम लेझर स्पीड कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

अत्याधुनिक कॅमेरे ताशी तब्बल 320 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या वाहनांचा अचूक वेग मोजण्यास सक्षम आहेत. तसेच हे कॅमेरे दिवस आणि रात्री दोन्ही वेळेस प्रभावीपणे कार्य करतात.
या कॅमेऱ्यांच्या मदतीने केवळ अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांवरच नव्हे, तर सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न घालणे, वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे अशा विविध वाहतूक नियमभंगांवरही लक्ष ठेवले जाणार आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी सांगितले की, पुणे ग्रामीण भागातील प्राणघातक रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वार आणि पादचारी यांचे प्रमाण जास्त आहे.
अतिवेग हे रस्ते अपघातांचे प्रमुख कारण असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे कडक अंमलबजावणी आणि जनजागृतीच्या माध्यमातून अपघातांमुळे होणारे मृत्यू आणि जखमींची संख्या कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले.