लोणीकाळभोर येथील एमआमटी परिसरात चोरांचा सुळसुळाट! चार लॅपटॉप चोरीच्या घटना; २ लाख १४ हजारांचा मुद्देमाल लंपास….

लोणी काळभोर : विद्यार्थ्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचा मोका साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या खोलीतील चार लॅपटॉप व मोबाईल चोरून नेल्याची घटना हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी परिसरात घडली आहे.
याप्रकरणी प्रथमेश अनिल चव्हाण (वय २०, सध्या रा. डी/९०४ फोर अॅव्हेन्यु, कदमवाकवस्ती, ता.हवेली, जि. पुणे. मुळ रा. जि. अकोला), अथर्व ओमप्रकाश कारभारी (वय २०, डी/११०४, फोर अॅव्हेन्यु, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि.पुणे, मुळ रा. वाकड जि.पुणे) व स्वप्निल संजय कुलकर्णी (वय २०, सध्या रा. फ्लॅट नंबर १, चिंतामणी पार्क सोसायटी, अर्थव रेसिडन्सी, एम. आय.टी कॉलेज जवळ, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि.पुणे. मुळ रा. जि. नाशिक) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील तिघेजण लोणी काळभोर येथील एमआयटी शैक्षणिक संकुलात शिक्षण घेत आहेत. ते शिक्षण संकुलाच्या जवळच असलेल्या इमारतींमध्ये फ्लॅट घेऊन भाडेतत्वावर राहतात. शनिवार (२ ऑगस्ट) रोजी सकाळच्या सुमारास घडलेल्या या तीन घटनेमध्ये चोरटयाने २ लाख १४ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. तिन्ही घटनेत मुलांचा दरवाजा उघडा असल्याने चोरट्याने संधी साधली आहे.
यामध्ये प्रथमेश चव्हाण याचा ५६ हजार ५०० रुपयांचा व अथर्व कारभारी यांचा ५० हजार रुपयांचा लॅपटॉप चोरून नेला. तर स्वप्निल कुलकर्णी याच्या फ्लॅटमधून ४५ हजार व १५ हजार ५०० रुपये किंमतीचे दोन लॅपटॉप याचबरोबर ४० हजार रुपयांचा अॅपल व ७ हजार रुपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल चोरून नेला आहे. या तीन चोरीच्या घटनेत २ लाख १४ हजारांच्या मुद्देमालाची चोरी झाली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.