पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; प्रसिद्ध वकील असीम सरोदेच्या ऑफिसबाहेर चोरी, मौल्यवान वस्तू चोरीला

पुणे: पुण्यातील विधीतज्ज्ञ आणि प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांच्या लॉ ऑफिसच्या परिसरात पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास चोरी झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.चोरट्यांनी सरोदे यांच्या ऑफिसच्या आवारातील मौल्यवान चंदनाची झाडे कटरच्या सहाय्याने तोडून नेली आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील डेक्कन परिसरात असणाऱ्या असीम सरोदे यांच्या कार्यालयाच्या समोर असणाऱ्या चंदनाच्या झाडाची चोरी पहाटे चोरट्यांकडून करण्यात आली आहे. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही चोरी करण्यात आल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.या घटनेनंतर पुणे पोलिसांकडे असीम सरोदे यांनी रीतसर तक्रार दाखल केली असून शहरात चंदन चोरांची मोठी गॅंग सक्रिय असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. पहाटेच्या वेळी चोरट्याची ही गॅंग अशा प्रकारे झाडांची कत्तल करत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आता विशेष तपासचक्रं फिरवली आहेत.

