मुंबई- गोवा महामार्गावर’ या’ वाहनांना बंदी; केव्हापासून वाचा सविस्तर

मुंबई : गणेशोत्सव चार दिवसांवर येऊन ठेपला असताना आता मुंबई- गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी केली आहे. ही सलग बंदी नसून तीन टप्प्यांमध्ये सरकारने अवजड वाहनांना बंदी घातली आहे.

गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणावर कोकणात जात असतात, त्यांचा प्रवास अधिक सोयीचा व्हावा यासाठी सरकारने ही बंदी घातली आहे.परंतू, जयगड बंदर आणि जेएनपीटी बंदर येथून आयात निर्यात मालाची वाहतूक करणारी वाहने दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, औषधं, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्य, भाजीपाला, नाशवंत माल, या जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना नियम लागू नाही. यासाठी वाहन चालकांना महामार्ग विभागाकडून प्रवेशपत्र घेणं सक्तीचं असणार आहे.
महामार्गावरील बंदी कशी असणार ?मुंबई- गोवा महामार्गावर अवजड वाहनांना २३ ते २८ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट, २ सप्टेंबरला दिवसभर आणि ६- ७ सप्टेंबर या कालावधीत बंदीअसणार आहे. तीन टप्प्यांमध्ये सरकारने आजपासून बंदी घातली आहे. २३ ऑगस्टपासून मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते २८ ऑगस्ट रात्री१२ वाजेपर्यंत मुंबई- गोवा महामार्गावरून अवजड वाहतूक बंद राहणार आहे. ५ दिवसांच्या गणपतीचे विसर्जन ३१ तारखेला होणार आहेत. त्या दिवशी सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत अवजड वाहनांना वाहतूकीसाठी बंदी राहणार आहे. तर, ७ दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन २ सप्टेंबरला होणार आहेत. त्यादिवशी देखील सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद राहणार आहे. तर, ६ सप्टेंबर २०२५ पासून सकाळी ८ वाजल्यापासून ते ७ सप्टेंबर २०२५ पर्यंत रात्री ८ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी राहील.
