पुण्यातील ‘या’ शाळांना सोमवारी सुट्टी, प्रशासनाचा मोठा निर्णय, 2 डिसेंबरला…


पुणे : राज्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांनी वातावरण चांगलंच तापलं आहे. 2 डिसेंबर 2025 रोजी राज्यभर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी 1 डिसेंबरला सकाळी 11 नंतर शाळांना सुट्टी देण्यात आली आहे, तर 2 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील लोणावळा नगरपरिषदेसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त पथके 1 डिसेंबर रोजी दुपारपर्यंत सर्व मतदान केंद्रांवर पोहोचणार आहेत. त्या आधी शाळांमध्ये तयार करण्यात आलेली मतदान केंद्रे रिकामी असणे आवश्यक आहे. त्यामुळे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक साबळे यांनी 1 डिसेंबर रोजी शाळांना सकाळी 11 नंतर सुटी देण्याचे आदेश सर्व संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना पाठवले आहेत.

दरम्यान, सकाळी नियमित वर्ग होणार असले तरी 11 नंतर विद्यार्थ्यांना सुटी देऊन मतदान केंद्रे प्रशासनाकडे देण्याची जबाबदारी शाळांना देण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेची अचूक आणि शांततेत अंमलबजावणी करण्यासाठी शाळांनी या निर्देशांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असल्याचेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

       

पुणे जिल्ह्यातील आळंदी, बारामती, चाकण, दौंड, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, सासवड, तळेगाव-दाभाडे, वडगाव यांसह लोणावळा नगरपरिषदाही या निवडणुकांमध्ये सहभागी आहे. मात्र लोणावळा नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक 10-अ आणि 5-ब हे पुढील तारखेला ढकलण्यात आले आहेत. तसेच तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील प्रभाग 2-अ, 7-अ, 7-ब, 8-अ, 8-ब आणि 10-ब हेही पुढे ढकलले गेले आहेत. या दोन्ही नगरपरिषदांसाठी मतदान 20 डिसेंबर रोजी घेण्यात येणार असून मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे. तरीही ज्या नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रात निवडणूक होत आहे, तेथील मतदान केंद्र असणाऱ्या शाळा बंद राहणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!