जिल्हा परिषदेच्या या सदस्यांना मिळणार पुन्हा संधी! बुचके, बांदल, बुट्टे या पारंपारीक सदस्य कुटूंबांचा रस्ता मोकळा….

पुणे : जिल्हा परिषदेसाठी सोमवारी (ता. १३ ऑक्टोबर) आरक्षण सोडत जाहीर झाली. यानंतर जिल्ह्यातील राजकारणाचे चित्र बदलणार असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकाऱ्यांना आरक्षण सोडतीमध्ये धक्का बसला आहे.
माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांचा गट हा अनुसूचित जाती राखीव झाला आहे. माजी अध्यक्ष देवराम लांडे यांचा गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला आहे. त्याचबरोबर माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, माजी सभापती शरद बुट्टे पाटील, देविदास दरेकर आदींचे आरक्षण सोडतीमध्ये यांचे गट राखीव झाल्याने त्यांना संधी मिळणार नाही.
याउलट माजी अध्यक्ष निर्मला पानसरे, माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, रणजीत शिवतरे, आशा बुचके, पूजा पारगे, अंकिता पाटील, चंद्रकांत बाठे, वीरधवल जगदाळे आदींना पुन्हा जिल्हा परिषदेत येण्याची संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहाची मुदत २० मार्च २०२२ रोजी संपली आहे. त्यामुळे मागील तीन वर्षापासून जिल्हा परिषदेचे कामकाज प्रशासक पाहत आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गाचा (ओबीसी) मुद्दा न्यायालयात असल्याने राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. आता निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने लवकरच जिल्हा परिषदेच्या निवडणूका जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेत पिढ्यान-पिढ्यांपासून कोणी ना कोणीतरी एक व्यक्ती कायम जिल्हा परिषदेवर काम करत असलेल्या जिल्ह्यातील दोन नामवंत घराण्यांपैकी यंदा पहिल्यांदाच आरक्षणामुळे एक घराणे यातून बाहेर पडले आहे. अन्य एक असलेल्या माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या घराण्यातील माजी सभापती सुनिता गावडे यांचा गट खुला झाला आहे. त्यामुळे या घरातील पोपटराव गावडे यांचे चिरंजीव राजेंद्र गावडे यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मावळत्या सभागृहात एकूण ७५ सदस्य होते. यापैकी एक सदस्य रोहित पवार हे सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यामुळे त्यांना अडीच वर्षेच सदस्यपदी राहता आले. त्यानंतर या गटाची पुन्हा पोटनिवडणूक झालीच नाही. त्यामुळे त्यानंतरची अडीच वर्षे हे सदस्यपद रिक्त राहिले. जिल्हा परिषद गटांच्या पुनर्रचनेत दोन गट कमी झाल्याने यंदाच्या निवडणुकीसाठी ही संख्या ७३ झाली आहे. दरम्यान, सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत खेड तालुक्यातील बाबाजी काळे, मुळशी तालुक्यातील शंकर मांडेकर आणि हवेली तालुक्यातील ज्ञानेश्वर कटके हे तीन सदस्य विधानसभेवर निवडून गेले आहेत.
जुन्नर तालुक्यातील रहिवासी असलेले माजी अध्यक्ष देवराम लांडे यांचा गट त्यांच्याच प्रवर्गासाठी राखीव झाला होता. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर निवडून येण्याची संधी निर्माण झाली होती. परंतू त्यांचा हा गट अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्याने त्यांची संधी गेली आहे. त्यामुळे ते त्यांच्या कुटुंबातील महिलेला निवडणूक रिंगणात उतरविण्याची शक्यता आहे.
अशीच स्थिती याच तालुक्यातील माजी उपाध्यक्ष पांडूरंग पवार आणि खेड तालुक्यातील माजी कृषी सभापती शरद बुट्टे पाटील यांच्या बाबतीत झाली आहे. याऊलट जुन्नर तालुक्यातील ज्येष्ठ सदस्या आशा बुचके यांना मात्र सलग पाचव्यांदा जिल्हा परिषदेवर येण्याची संधी मिळाली आहे.