राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष पदासाठी हे नेते इच्छुक, शरद पवार नेहेमीप्रमाणे घेणार वेगळा निर्णय?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही दिवसापासून मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी नको, तर पक्षाच्या संघटनात्मक बांधणी विषयी जबाबदारी देण्याची मागणी एका कार्यक्रमात केली आहे.

असे असताना अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्षपद मागितले. असे असताना राज्यातील जातीय समीकरणांचा विचार केल्यास पवार यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष होणे सोपे नाही. यासाठी शरद पवार अनेकदा विचार करतील.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत. सुप्रिया सुळे कार्याध्यक्ष झाल्या आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद अजित पवार यांना दिले तर एकाच घरात पदांची अशाप्रकारे वाटणी शरद पवार यांना मान्य होईल का हा खरा प्रश्न आहे.

जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावर पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या पदावर नवीन नेत्याची निवड होण्याची शक्यता आहे. यामध्ये धनंजय मुंडे, राजेश टोपे, सुनील तटकरे, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची चर्चा सध्या सुरु आहे.
असे असताना मात्र, शरद पवार त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने वेगळा निर्णय घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देऊ शकतात, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
यामुळे शरद पवार पुन्हा एकदा भाकरी फिरवणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी छगन भुजबळ यांनी देखील मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, प्रदेशाध्यक्षपद मला दिले, तर मी काम करेन. राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद हे ओबीसी समाजाला द्यायला हवे.
त्यामुळे सुनील तटकरे, धनंजय मुंडे , जितेंद्र आव्हाड हे ओबीसी चेहरे आहेत. त्यांना संधी द्यायला हवी. मला संधी मिळाली तर मी देखील काम करेन. असेही ते म्हणाले.