नवीन वर्षात ‘हे’ 6 मोठे नियम बदलणार, कर्मचाऱ्यांपासून ते शेतकऱ्यांवर होणार परिणाम, जाणून घ्या संपूर्ण माहिती..

पुणे : नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 1 जानेवारी 2026 पासून दैनंदिन जीवनाशी संबंधित काही महत्त्वाचे नियम बदलणार असून याचा थेट परिणाम सामान्य लोकांवर होणार आहे.

आर्थिक व्यवहारांपासून ते सोशल मीडिया वापरापर्यंत अनेक बाबींमध्ये हे बदल लागू होणार आहेत. नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून लागू होणाऱ्या या नियमांमुळे काही गोष्टी अधिक कडक होणार असून काही बदल सामान्य नागरिकांच्या सोयीसाठी असणार आहेत. त्यामुळे 1 जानेवारी 2026 पूर्वीच हे नियम समजून घेणे आणि आवश्यक ती तयारी करणे सर्वसामान्यांसाठी गरजेचे ठरणार आहे.

नव्या वर्षापासून सोशल मीडिया वापराबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर वयोमर्यादा आणि पालक नियंत्रण लागू करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर आहे. हा निर्णय अंतिम झाल्यास लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर पालकांचे नियंत्रण वाढणार असून त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हा बदल महत्त्वाचा ठरणार आहे.

केंद्र सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केले असून यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत पॅन-आधार लिंक न करणाऱ्यांचे पॅन कार्ड 1 जानेवारी 2026 पासून निष्क्रिय होणार आहे. यामुळे बँकिंग, कर भरणा आणि इतर आर्थिक व्यवहार करताना मोठ्या अडचणी येण्याची शक्यता आहे.
याशिवाय पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठीही नियम बदलणार आहेत. 1 जानेवारी 2026 पासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर युनिक आयडी बंधनकारक करण्यात येणार आहे. तसेच पेटीएम, अमेझॉन पे, मोबिक्विक यांसारख्या थर्ड पार्टी ॲप्समधून 5000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. क्रेडिट कार्डद्वारे गेमिंग प्लॅटफॉर्मवर व्यवहार केल्यासही जादा शुल्क द्यावे लागणार आहे.
दरम्यान, कर्जदारांसाठी दिलासादायक बदल म्हणजे सिबिल स्कोर अपडेटचा कालावधी कमी होणार आहे. सध्या पंधरा दिवसांनी अपडेट होणारा क्रेडिट स्कोर आता दर आठवड्याला अपडेट केला जाणार आहे. यामुळे कर्ज मंजुरी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जलद होण्याची शक्यता आहे. तसेच 1 जानेवारी 2026 पासून घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीही अपडेट होणार असून दर वाढणार की कमी होणार, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
