विजांचा कडकडाट होणार ; राज्याच्या ‘या ’18 जिल्ह्यात आज पावसाची शक्यता

पुणे : राज्यातील पावसाचा जोर ओसरला असला तरी, काही ठिकाणी हलका पाऊस पडतो आहे. आज 3 ऑगस्ट रोजी विदर्भात विजांसह पावसाच्या सरींची शक्यता आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाश राहण्याचा, तसेच तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पूर्व विदर्भातील वर्धा,नागपूर,भंडारा, गोंदिया,चंद्रपूर,गडचिरोली इत्यादी जिल्ह्यामध्ये आज विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.त्या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. विजां सह पावसाची शक्यता असलेल्या जिल्ह्यामध्ये कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच मध्य महाराष्ट्रातील धुळे, नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली,कोल्हापूर,सोलापूर,धाराशिव,नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
दरम्यान सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासात 2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात साताऱ्यातील कमाल तापमान 26.7 अंश सेल्सिअस राहिल. सातारा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी 7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान 26.9 अंश सेल्सिअस राहिले. आज कमाल तापमान 29 अंशावर राहिल. कोल्हापूर जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह एक-दोन वेळा तुरळक पाऊस पडेल.
सोलापूरमध्ये मागील 24 तासात 1 मिलीमीटर पाऊस आणि 33.0 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात कमाल तापमान 34 अंशावर राहण्याची शक्यता आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता कायम आहे.
गेल्या 24 तासात सांगली जिल्ह्यामध्ये 2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 30 तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके राहील.
पश्चिम महाराष्ट्रात पावसाच्या उघडिपीसह तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. काही ठिकाणी ढगाळ आकाश आणि हलक्या सरींची शक्यता आहे. हवामानातील सततच्या बदलामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.