मोठी बातमी! पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिका होणार; अजित पवार यांनी केली घोषणा…

पुणे : पुणे जिल्ह्यामध्ये नव्याने तीन महापालिका कराव्या लागणार आहेत, अशी महत्त्वाची आणि मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे. मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागात एक महापालिका तसेच चाकण आणि हिंजवडी भागात ही महापालिका करावी लागणार आहे, असं अजित पवार म्हणाले.

आज (८ ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या चाकण चौक आणि परिसराची पाहणी केल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले. चाकण-शिक्रापूर आणि पुणे-नाशिक मार्गावरील वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. चाकण एमआयडीसीमध्ये १५०० हून अधिक कंपन्यांमध्ये सुमारे साडेतीन लाख कर्मचारी काम करतात.
त्यामुळे या परिसरात दररोज लाखो वाहनांची ये-जा असते. या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी वाहतूक कोंडी फोडण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे. या पाहणीदरम्यान अजित पवारांनी चाकणला स्वतंत्र महानगरपालिका करावी लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

अजित पवार यांनी यावेळी चाकणची तुलना बारामतीशी करू नका असेही म्हटले आहे. ते म्हणाले की, आज मी चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने दौरा केला. सकाळी ५:४५ वाजता मी आलो. नॅशनल हायवे, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी, पालिकेचे आयुक्त या सर्वांना मी योग्य त्या सूचना दिल्या आहेत.
तळेगाव ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरी करणार आहे आणि त्यासाठी निधीही देतोय. त्यानंतर पुणे-नाशिक हा एलिव्हेटेड मार्ग करूयात. हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. तुम्ही खूप त्रास सहन केलाय, तुम्ही सहनशीलता दाखवली. पण आता यातून सुटका करूयात.
अजित पवारांनी पुणे जिल्ह्यात नव्याने तीन महापालिका कराव्या लागणार असल्याचे म्हटले आहे. यापैकी एक मांजरी, फुरसुंगी आणि उरळी देवाची या भागात, दुसरी चाकण परिसरात आणि तिसरी हिंजवडी भागात महापालिका होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सकाळी ६ वाजताच्या पाहणीदरम्यान एक गाडी थांबली की लगेच गाड्यांच्या रांगा लागतात, तर पिक टाईममध्ये काय अवस्था होत असेल, असे त्यांनी म्हटले.