महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीत येत्या सोमवारी ‘सोमवारी यात्रा ‘नाही

पुणे : महाराष्ट्राचे श्रध्दास्थान आणि कुलदैवत म्हणून प्रसिध्द असलेल्या खंडोबाच्या जेजुरीत येत्या सोमवारी अमावस्येचा सूर्योदय नसल्याने खंडोबा पालखी सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

येत्या सोमवारी( दिनांक 16) अमावस्येचा प्रारंभ सायंकाळी 5 वाजून 33 मिनिटांनी सुरू होत असून मंगळवारी समाप्त होत आहे. सोमवारी अमावस्या ही सूर्योदय काळात येत नसल्याने सोमवती उत्सव नसल्याने खंडोबा देवाचा पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी निघणार नसल्याचे मुख्य मानकरी इमानदार राजाभाऊ पेशवे तसेच श्री खंडोबा पालखी सोहळा ग्रामस्थ खांदेकरी मानकरी मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे यांनी सांगितले आहे
उद्या रविवारी महाशिवरात्री उत्सव सुरू होत आहे. या काळात मुख्य मंदिरामध्ये त्रैलोकीच्या शिवलिंग दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. वर्षातून एकदाच ही शिवलिंग धार्मिक विधी व दर्शनासाठी खुली होत असल्याने पोलीस प्रशासन, नगरपालिका, विश्वस्त मंडळ,ग्रामस्थ,पुजारी, सेवेकरी मंडळाने बैठकीत उत्सवाचे नियोजन केले आहे

दरम्यान सोमवारी अमावस्या काळात सूर्योदय आला तरच हा सोमवती उत्सव गृहीत धरला जातो.त्यामुळे खंडोबा म्हाळसादेवीच्या उत्सव मूर्ती सह पालखी सोहळा नदी तीरावरील पापनाश तीर्थाकडे स्नानासाठी मार्गस्थ होत असतो. मात्र यावेळी अमावस्येचा सूर्योदय मंगळवारी(ता. 17) होत असल्याने पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी निघणार नसल्याचे मुख्य मानकरी पेशवे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे यांनी सांगितले आहे.