संपूर्ण देशात आज मुसळधार पाऊस बरसणार! अनेक शाळांना सुट्टी, बाहेर पडताना काळजी घ्या…

नवी दिल्ली : देशातील विविध भागात पावसाने थैमान घातले आहे. देशभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवस जवळपास संपूर्ण देशात मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे.
भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवस हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे आणि ऑरेंज ते यलो अलर्ट जारी केला आहे.
त्याचप्रमाणे २७ जुलै रोजी मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, कर्नाटक, किनारी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथे २८ तारखेसाठी ऑरेंज इशारा दिला आहे. मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून पुढील दोन दिवस पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे. रायगडमधील सर्व शाळा गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. दक्षिण ओडिशामध्येही मुसळधार पाऊस पडत आहे.
मलकानगिरी जिल्ह्यात पुरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. तेलंगणातील पूरस्थितीही बिकट आहे. हिमाचलमध्ये राष्ट्रीय महामार्ग बंद असून शिमला जिल्ह्यातील रामपूर उपविभागातील सरपारा पंचायतीच्या कंदाहार गावात, मंगळवारी उशिरा एकाच ठिकाणी दोन ढगफुटीनंतर आलेल्या पुरात प्राथमिक शाळा, युथ क्लबच्या इमारतीसह पाच घरे वाहून गेली. रात्री सफरचंद बागांचे नुकसान झाले आहे.
अनेक गुरेही वाहून गेली आहेत. त्याचवेळी, ब्रोनी आणि ज्यूरी येथे भूस्खलनामुळे शिमला-किन्नौर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. चंबा, कांगडा, सिरमौर, शिमला, बिलासपूर, हमीरपूर, कुल्लू, मंडी आणि किन्नौर जिल्ह्यात पुढील २४ तासांसाठी पुराचा इशारा जारी करण्यात आला आहे.