येत्या जानेवारीपासून रेशन धान्य वाटपात पुन्हा बदल; कुणाला किती लाभ मिळणार?

पुणे:राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013अंतर्गत लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या रास्त दर धान्याच्या मासिक वाटपात पुन्हा एकदा बदल करण्यात येणार आहे.नव्या निर्णयानुसार, जानेवारी 2026 पासून अंत्योदय शिधापत्रिका धारकांना प्रती शिधापत्रिका 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू देण्यात येणार आहे.यामुळे लाखो शिधापत्रिकाधारकांच्या मासिक धान्य मिळकतीत बदल होणार असून, पुरवठा विभागाने याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
सुरुवातीच्या काळात अंत्योदय कार्डधारकांना 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू, तर प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू दिले जात होते. मात्र नंतर पुरवठा विभागाने तात्पुरता बदल करत अंत्योदय लाभार्थ्यांसाठी 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू, तर प्राधान्य कुटुंबासाठी प्रति सदस्य 4 किलो तांदूळ आणि 1 किलो गहू असे वितरण सुरू केले होते.
पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे की, डिसेंबर 2025 महिन्यासाठी सध्या सुरू असलेलेच वितरण प्रमाण कायम राहणार आहे. म्हणजेच डिसेंबरमध्ये अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू, तर प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति सदस्य 4 किलो तांदूळ आणि 1 किलो गहू असेच धान्य मिळणार आहे. या महिन्यात कोणताही बदल लागू होणार नाही.

मात्र आता नव्या निर्णयानुसार, जानेवारी 2026 पासून अंत्योदय शिधापत्रिका धारकांना प्रती शिधापत्रिका 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू देण्यात येणार आहे. तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत प्रत्येक सदस्यासाठी दरमहा 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू वाटप करण्यात येईल. हा बदल राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातील मूळ तरतुदींनुसार करण्यात येणार आहे.

