लाठीचार्ज झाला नाही, राजकारण करू नका, वारकऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फडणवीसांचे वक्तव्य


पुणे : काल पालखी सोहळा पंढरपूरकडे रवाना झाला आहे. यामध्ये आळंदीत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा सुरू असताना वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाला. याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत.

या घटनेवर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आळंदी येथे कोणताही लाठीचार्ज झालेला नाही, त्यामुळे न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका. असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

ते म्हणाले, आपल्यासाठी वारकऱ्यांची सुरक्षा सर्वाधिक महत्वाची आहे. गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या.

त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त ढगे पाटील आणि सर्व मानाच्या दिंडीचे प्रमुख यांची एक बैठक झाली आणि गेल्यावर्षीसारखी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून सर्वानुमते निर्णय घेण्यात आला की प्रत्येक मानाच्या दिंडीला 75 पासेस देण्यात याव्यात.

त्यानुसार संपूर्ण नियोजन करण्यात आले. काही स्थानिक तरुणांनी मध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे थोडी झटापट झाली. आता परिस्थिती संपूर्णपणे शांत असून पोलिस स्थानिकांशी चर्चा करीत आहेत.

आम्ही सुद्धा गांभीर्याने याची दखल घेतली आहे. काही माध्यमांनी याचे वृत्तांकन करताना फार मोठा लाठीमार अशा बातम्या दिल्या, माझी माध्यमांना विनंती आहे की जे झाले नाही, त्यातून जनतेत क्षोभ निर्माण होईल, असे काही करू नका, असे ते म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!