पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मध्यरात्री खलबतं ; कशावर झाली चर्चा?

पुणे: राज्यात महानगरपालिकांचं बिगुल वाजल्यानंतर आता पुण्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. अशातच पुण्याच्या राजकीय वर्तुळात दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यांनतर मध्यरात्री पहिली बैठक पार पडली. जागावाटपासंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी म्हणून नाही तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढन्याची तयारी सध्या सुरु आहे. शरद पवार गटाने अजित पवार गटाकडे ४०-४५ जागा मागितल्याची माहिती आहे. मात्र एवढ्या जागा न देता ३० जागा देण्याची तयारी अजित पवार गटाने दर्शवली असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान या संदर्भातला अंतिम निर्णय आहे तो सुप्रिया सुळे आणि अजित पवार घेणार आहेत. या बैठकीला शरद पवार गटाकडून अंकुश काकडे, वंदना चव्हाण, अश्विनी कदम तर अजित पवार गटाकडून सुभाष जगताप आणि काही स्थानिक नेते उपस्थित होते. रात्री १२ च्या सुमारास ही बैठक पार पडल्याची माहिती आहे.

दरम्यान निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याबरोबर काँग्रेस यांच्यामध्ये जागा वाटपाबाबत बैठक झाली. त्यामध्ये काही जागांवर निर्णय झाला. पण काही जागांवर तोडगा निघाला नाही. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेसचे जागा वाटपाच्या चर्चा सुरूच आहेत. येत्या एक ते दोन दिवसांत जागा वाटपाचा निर्णय होण्याची शक्यता आहे
