पुणे रेल्वे स्टेशनवर खळबळ ; रिक्षा चालकाचा साथीदारांसह तरुणावर हल्ला, तब्बल ‘इतका’ ऐवज लुटला….

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे रेल्वे स्थानक हे अत्याचार,खून, हाणामारी आणि चोरीच्या घटनेने चांगले चर्चेत आले आहे. अशातच आता पुणे रेल्वे स्थानक परिसरात रविवारी पहाटे एका रिक्षा चालकाने तरुणाचा विश्वास संपादन करून त्याच्या दोन साथीदारासह त्याच्यावर हल्ला करून जबरी चोरी केली आहे.त्यांनी प्रवाशाकडून २८ हजार ७०० रुपयांचा ऐवज लुटला आहे. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विजय माने (वय २४, रा. नवी मुंबई) या तरुणाने तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार तरुण रिक्षाची वाट पाहत असताना ‘मी सोडतो ‘असे सांगून रिक्षा चालक त्याच्या जवळ येतो. त्यावेळी रिक्षात असणारे आणखी दोघेजण असे मिळून तिघेजण त्या तरुणावर हल्ला करतात.त्यांनी तरुणाचे दोन्ही हात पकडून त्याच्या खिशातील मोबाइल, अंगठी, सोन्याची बाळी आणि रोख रक्कम असा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला. असा एकूण 28 हजार 700 रुपयांचा ऐवज त्यांनी लुटला. त्यानंतर हे तिघे रेल्वे स्थानकाच्या दिशेने रिक्षातून फरार झाले. तरुणाने वानवडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

दरम्यान या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळेला रिक्षाचालकांवर विश्वास ठेवावा की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिस आरोपींचा माग काढत असून, गुन्हा उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

