अवकाळी मदतीसाठी पैसे नाहीत, कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, पण मुख्यमंत्र्यांच्या घरी 40 लाखांचा सोफा, मुख्यमंत्रीसाहेब हे पटतय का?

मुंबई : आज संपूर्ण राज्यात अतिवृष्टीने शेतकरी उध्वस्त झालेला असताना, सरकारकडे पैसे नसल्याने शेतकऱ्यांना मदत, कर्जमाफी दिली जात नाही. सध्या राज्यावरील कर्जाचा बोझा ९.५ लाख कोटींच्या वर गेला असताना सरकारकडून इतर अनावश्यक ठिकाणी पैशांची उधळपट्टी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या शासकीय घरी म्हणजेच वर्षा निवासस्थानी double bed matress, सोफा यासाठी २०.४७ लाख रुपये तर किचन दुरुस्तीसाठी १९.५३ लाख असा एकूण ४० लाखाहून अधिक पैसा खर्च केला गेला आहे.
इतका पैसा खर्च जात असेल तर यास जनतेच्या पैशाची उतमात म्हणावं की वाढलेली महागाई? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यामुळे आता यावर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच रोहित पवार म्हणाले,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कदाचित हे माहित नसेल.

पण हे असंच चालू राहिलं तर ‘रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे’ असाच त्याचा अर्थ निघेल. मंत्र्यांच्या घरांच्या दुरुस्तीची कामं केली पाहिजेत पण केंव्हा आणि त्यासाठी किती खर्च करावा याचाही ताळमेळ असला पाहिजे ना. असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.
यामुळे आता राजकीय वातावरण तापले आहे. रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून अनेक मंत्र्यांची वेगवेगळी प्रकरणे बाहेर काढत आहेत. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार हे लवकरच समजेल.? मुख्यमंत्र्यांनी याबाबत अजून काही वक्तव्य केले नाही.