पुणे पोलीस दलात खळबळ! लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील तब्बल 32 कर्मचाऱ्यांची उचलबांगडी, आयुक्त अमितेश कुमारांचे आदेश जारी..

पुणे : पुणे पोलिस दलात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आयुक्तांकडून करण्यात आली आहे. पुण्यातील लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील तब्बल 32 कर्मचाऱ्यांची पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून एकाच वेळी बदली करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी रात्री उशिरा परिपत्रकाद्वारे लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील 32 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे कर्मचारी हे कार्यकाळ संपवून सुद्धा तिथेच कार्यरत राहणारे, पोलिस ठाण्याच्या जवळ राहणारे, तसेच कर्तव्यात कमी पडलेले कर्मचारी यांची ठाण्यातून उचलबांगडी करण्यात आली आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 22 (एन )अन्वये हे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार तीन सहाय्यक फौजदार,10 पोलिस हवलदार, 19 पोलीस अंमलदार यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी नव्या ठिकाणी हजर झाल्याचा अनुकरण अहवाल कार्यालयात सादर करणे बंधनकारक असल्याचही आदेशात नमूद करण्यात आल आहे.

दरम्यान आदेशाप्रमाणे या बदल्या प्रशासकीय कारणामुळे जरी झाल्या असल्या तरी सुद्धा या निर्णयामागे काही इतर आणि तेवढीच महत्त्वाची कारणं आहेत का? अशा चर्चा पोलिस दलात सुरू झाल्या आहेत.