पुण्यात उद्योगविश्वात खळबळ! महिला कर्मचाऱ्यासोबत ऑफिसमध्येच नको ते घडलं, कंपनीच्या CEO सह ५ जणांविरोधात गुन्हा दाखल…

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील नामांकित ‘आनंद राठी वेल्थ’ या वित्तीय संस्थेत महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे कॉर्पोरेट क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. ३३ वर्षीय पीडित महिला कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी कंपनीतील अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
राकेश रावल (मुख्य कार्यकारी अधिकारी – CEO), फिरोज अजीज (सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी), तेजल शहा (एचआर विभाग प्रमुख), स्वपन चक्रवर्ती (कार्यकारी संचालक) आणि सोनाली रावल अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, मे २०२४ पासून हा प्रकार सुरू होता. कार्यकारी संचालक स्वपन चक्रवर्ती याने महिलेचा विनयभंग केला आणि तिचा पाठलाग करून छळ केला. जेव्हा पीडित महिलेने या प्रकाराबाबत कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आणि इतर संचालकांकडे तक्रार केली, तेव्हा त्यांनी कारवाई करण्याऐवजी चक्रवर्तीला पाठीशी घातल्याचा आरोप महिलेने केला आहे.

इतकेच नव्हे तर, तक्रार केल्याचा राग मनात धरून सूडबुद्धीने पीडित महिलेची बदली थेट दुबईतील कार्यालयात करण्यात आली, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणावर कंपनीच्या मुख्य मानव संसाधन अधिकारी तेजल शाह यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “संस्था म्हणून आम्ही सर्व प्रक्रिया पारदर्शक आणि न्याय्य पद्धतीने पार पाडण्यास कटिबद्ध आहोत. सुरक्षित कार्यस्थळ राखणे ही आमची प्राथमिकता असून संबंधित प्राधिकरणांशी आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत,” असे त्यांनी सांगितले.