…तर मी हिमालयावरूनही उडी मारेन!! जितेंद्र आव्हाडांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे निर्णय घेतील, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार गळतीला घाबरत नाहीत. १९८० साली ६० आमदार निवडून आले होते, त्यापैकी ५८ आमदार सोडून गेले होते. पवारसाहेब नेते घडवणारी फॅक्टरी आहेत, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. माझी भूमिका अशी आहे की, पवारसाहेबांनी हिमालयावरून उडी मारायला सांगितली, तरी मी मारेन, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या मुद्द्यावर माझ्याशी कोणीही बोलले नाही, त्यामुळे अशी कोणतीही चर्चा सुरू आहे, असे मला वाटत नाही, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले. उत्तमराव जाणकर यांनी त्यांची भावना व्यक्त केली, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. ते सर्वांना मोकळीक देतात. तुम्हाला मत मांडता येते.

फ्रंटलच्या लोकांनी उलट त्यांचे प्रेझेंटेशन दिले आहे. त्यामुळे त्यांच्या काही नव्या नियुक्त्या करण्याचा प्रश्न नाही, असेही आव्हाड म्हणाले आहे. जयंत पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाची तातडीची रणनीती स्पष्ट केली आहे.
त्यांनी सर्व जिल्हा व तालुका स्तरावरील यंत्रणांना बुथ स्तरावर मजबूत करण्याचे आवाहन केले आहे. सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळात विविध शासकीय कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या प्रचंड भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ती भूमिका पार पाडावी, असे आवाहन पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना केल्याचे तपासे यांनी सांगितले.
पक्षातील नवीन पिढीला सक्षम करण्याच्या उद्देशाने, पक्ष युवक व महिला आघाड्यांचे बळकटीकरण करणार आहे व नवोदित व उत्साही स्वयंसेवकांना मोठ्या प्रमाणावर पक्षात सहभागी करून घेतले जाणार आहे, असेही जयंत पाटील यांनी नमूद केले. पक्षातील वरिष्ठ नेते मंडळी संपूर्ण राज्यभर लवकरच दौरे करणार आहेत व जिल्हा तालुका स्तरावरील पक्ष संघटनेचा व शासकीय स्तरावरील योजनांचा आढावा घेणार आहेत, असेही जयंत पाटील यांनी सांगितल्याचे तपासे यांनी सांगितले आहे.
