उरुळीकांचनमध्ये खाद्य तेलाच्या डब्यांची चोरी करणाऱ्या चोरट्यांना नागरीकांनी पकडले ! चोरांच्या घटनांत पहिली घटना नागरीकांनी केली उघड …
उरुळी कांचन : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत किराणा दुकानात खाद्य तेलांच्या डब्यांची चोरी करणाऱ्या दरोडेखोरांना ग्रामस्थांनी मोठ्या शिताफीने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ग्रामस्थांनी तिघांना पकडले असून दोघेजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाल्याची माहिती पोलिसांना दिली.
रविवारी (ता. 08) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास कस्तुरी मंगल कार्यालयाच्या शेजारी असलेल्या विजय ट्रेडर्स या ठिकाणी हि घटणा घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय चावला यांचे उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत विजय ट्रेडर्स नावाने होलसेल किराणा दुकान आहे. विजय चावला यांच्या भावाचा मुलगा दगडूशेठ गणपती पुणे येथे दर्शनाला गेला होता. संध्याकाळी एक वाजता घरी आल्यानंतर त्याने दुकानाचे सीसीटीव्ही तपासले असता त्याला सीसीटीव्हीचा कॅमेरा फिरवलेला दिसून आला.
सदरची माहिती त्याने चुलते विजय चावला यांना दिली. त्यानुसार त्यांनी सदरची माहिती कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे व उरुळी कांचन पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार मिलिंद कांचन, नाना मेमाणे, कौस्तुभ मेमाणे, अक्षय (बंटी) कांचन, सागर (आबा) कांचन, आशितोष तुपे व परिसरातील 10 ते 20 तरुणांनी तोपर्यंत दुकानाला वेढा मारला. यावेळी दुकानाचा पत्रा फोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केल्याचे दिसून आले. नागरिकांच्या मदतीने तीन दरोडेखोर नागरिकांनी पकडले. तर दोघेजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
सदरच्या टोळीतील दरोडेखोर टोळीचा म्होरक्या व त्याचा एक जोडीदार हा विजय ट्रेडर्स या दुकानातच काम करीत होता. त्यानेच या दुकानात दरोडा टाकल्याची माहिती समोर आली असून अंधाराचा फायदा घेत तो पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. सदरच्या तीन टोळक्यांना ग्रामस्थांनी पोलीसांच्या ताब्यात दिले.
दरम्यान, ग्रामस्थांच्या मदतीने दोन अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. सातत्याने होत असलेल्या चोरीच्या घटनांनी हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी अन्य आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. तापस उरुळी कांचन पोलीस करीत आहेत.