भयंकर! दुसरीशी संबंध ठेवले म्हणून तरुणीने नातं संपवलं, तरूणाने लिव्ह-इन, लग्नाचं आमिष दाखवले अन्….

अहिल्यानगर : सोशल मीडियावरील ओळखीचा गैरफायदा घेत लग्नाचे आमिष दाखवून, खासगी फोटोच्या आधारे भावनिक ब्लॅकमेल करत एका युवतीला पुणे जिल्ह्यात नेऊन तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केल्याचा गंभीर आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

लिव्ह-इन रिलेशनशिपच्या नावाखाली कागदावर सही करून घेत फसवणूक केल्याचा आरोप पीडित युवतीने केला आहे. कर्जत तालुक्यातील मूळ रहिवासी आणि सध्या अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगरात वास्तव्यास असलेल्या २१ वर्षीय युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत तालुक्यातील गुन्हेगाराविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी (ता.७ जानेवारी) रात्री गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी युवतीची आरोपीशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले. मात्र, आरोपीने दुसऱ्या मुलीशी संबंध सुरू केल्यानंतर पीडितेने त्याच्याशी सर्व संपर्क तोडला. याचाच राग मनात धरून आरोपीने तिचे काही खासगी फोटो अद्याप स्वतःकडे ठेवल्याचे डिसेंबर २०२५ मध्ये उघड झाले.

हे फोटो डिलीट करण्याच्या बहाण्याने आरोपीने पीडितेला तारकपूर बसस्थानकावर बोलावले. २९ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी तिला कारमध्ये बसवून लग्नाचे खोटे आश्वासन देत, भावनिक दबाव टाकत पुणे जिल्ह्यातील आळंदी व त्यानंतर मुळशी येथील नातेवाईकांच्या घरी नेण्यात आले.
दरम्यान, तेथे एका कागदावर जबरदस्तीने सही करून घेतल्यानंतर तो कागद लिव्ह-इन रिलेशनशिपचा असल्याचे सांगून पीडितेची फसवणूक करण्यात आली. त्यानंतर १ जानेवारी २०२६ रोजी दुपारी आरोपीने पीडितेवर जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले, असा गंभीर आरोप फिर्यादीत नमूद आहे.