क्षणात संसार उध्वस्त झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री भीषण आग, 19 झोपड्या जळून खाक…

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात मध्यरात्री भीषण आग लागून कामगारांच्या तब्बल 19 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. अज्ञाताने एका घरासमोरील पेटवून दिलेल्या मोटरसायकलच्या धगीने मध्यरात्री ही आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे. या आगीमुळे भाडेकरूंचा संसार जळून खाक झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, काही अज्ञात मुलांनी परिसरातील मोटरसायकल पेटवली. पेटलेल्या दुचाकीचा स्फोट झाल्यानंतर शेजारील पत्र्याच्या झोपड्यांना आग लागून भीषण दुर्घटना घडली. घरातील लोकांना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करून सर्वांना बाहेर काढले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
या आगीत कामगार मजुरांची तब्बल 19 घरे, संसारोपयोगी वस्तू, महत्त्वाचे कागदपत्रे आणि तीन दुचाकी जळून खाक झाल्या.येथील कुटुंबे बिगारी काम करून उदरनिर्वाह करत होती. या दुर्घटनेमुळे त्यांचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला आहे. स्थानिक प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी होत आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच आग लावणाऱ्या अज्ञात मुलांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. CCTV फुटेज तपासले जात असल्याची माहिती मिळाली आहे.