प्रतीक्षा संपली! दहावीचा निकाल जाहीर, पुणे विभागाचा निकाल 94.81 टक्के, कोणता विभाग अव्वल?

पुणे : आज, १३ मे रोजी महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल लागला आहे. यंदा राज्यभरातून एकूण १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यंदाचा एकूण निकाल ९४.१० टक्के लागला असून, राज्यातील विद्यार्थ्यांनी यंदाही उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
निकाल आज दुपारी १ वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.यावर्षी परीक्षेसाठी एकूण 15,58,020 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 14,55,433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली असून अनेक शाळांनी 100 टक्के निकाल मिळवला आहे.
निकाल जाहीर करताना बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी परीक्षेतील महत्त्वाच्या बाबींची माहिती दिली. यंदाही कोकण विभागाने सर्वाधिक 99.82 टक्के निकालासह अव्वल स्थान पटकावलं आहे. तर पुणे विभागाचा निकाल 94.81 टक्के इतका लागला आहे. इतर विभागांमध्ये कोल्हापूर (96.78%), मुंबई (95.84%) यांची कामगिरी विशेष उल्लेखनीय राहिली आहे.
दरम्यान, दुसरीकडे, सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (90.78%) लागला आहे. विद्यार्थ्यांनी 63 विषयांपैकी 24 विषयांमध्ये 100% निकाल मिळवला असून, 7,924 शाळांनी 100% निकाल नोंदवला आहे.
यंदा राज्यभरातून 211 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. त्यात लातूर (113), संभाजीनगर (40), पुणे (13), कोल्हापूर (12) अशा विविध विभागांचा समावेश आहे. तर, 285 विद्यार्थी केवळ पासमार्क्स मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
एकूण 9 विभाग निहाय निकाल
पुणे -94.81 टक्के
नागपूर- 90.78 टक्के
संभाजीनगर- 92.82 टक्के
मुंबई-95.84 टक्के
कोल्हापूर- 96.78 टक्के
अमरावती-92.95 टक्के
नाशिक- 93.04
लातूर-92.77
कोकण- 99.82
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे खालील प्रमाणे..
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
http://sscresult.mkcl.org.