Accident News : भरधाव ट्रकची दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक; २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू! थेऊर परिसरातील घटना

लोणी काळभोर : एका भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २० वर्षीय दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हवेली तालुक्यातील थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील मुळा-मुठा नदीच्या पुलाजवळून समोर आली आहे.

अथर्व संतोष हिंद्रे (वय २०, रा. भौरोबा गल्ली, फलटण, जि. सातारा) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व हिंद्रे हा दुचाकीवरून गावी फलटणला निघाला होता. दुचाकीवरून जात असताना, त्याची गाडी मुळा-मुठा नदीच्या पुलाजवळून थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत आली. तेव्हा त्याच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगाने चाललेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात अथर्व हिंद्रे हा गंभीर जखमी झाला.

या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमीला लोणी काळभोर येथील एका बड्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
दरम्यान, या अपघातात २० वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.