पुण्यात सोबत राहायचे दोघं, पण अचानक मित्रानं डोक्यात सिलिंडर घालून केली हत्या, नेमकं काय घडलं?


पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

पुण्यातील मोशी परिसरात एका क्षुल्लक वादातून हत्येची थरारक घटना घडली आहे. ‘जेवण कोणी बनवायचं?’ या साध्या कारणावरून झालेल्या वादाचं रूपांतर थेट खुनात झालं. यात एका तरुणाच्या डोक्यात गॅस सिलिंडरची टाकी घालून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

बालाजी मारुती खंडारे (वय ३२, मूळ रा. उदगीर, जि. ला लातूर) असं मृत तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी त्याचाच मित्र प्रदीप विठ्ठल गुंडरे (वय २९, मूळ रा. अहमदपूर, जि. लातूर) याला बेड्या ठोकल्या आहेत. हे दोन्ही तरुण कामासाठी लातूरहून पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते आणि मोशी परिसरात एकत्र राहत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांमध्ये जेवण बनविण्यावरून जोरदार भांडण झालं. वादाचे रूपांतर हाणामारीत झालं आणि संतापलेल्या प्रदीपनं घरातील गॅस सिलिंडरची टाकी उचलून थेट बालाजीच्या डोक्यात मारली. या भीषण हल्ल्यात बालाजीचा जागीच मृत्यू झाला.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. एका छोट्याशा वादाने एका तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!