मस्साजोग सरपंच पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले! संतोष देशमुखानंतर पत्नी सांभाळणार कारभार? कसा असेल संपूर्ण कार्यक्रम..

पुणे : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मस्साजोग गावचे सरपंचपद रिक्त होते.या सरपंच पदासाठी आता पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आज 7 एप्रिल 2026पासून मस्साजोग गावच्या सरपंच पदाचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. संतोष देशमुख यांच्यानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख या सरपंच पदी विराजमान व्हाव्या यासाठी गावकऱ्यांनी पसंती दिली आहे. त्यामुळे या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

बीड जिल्ह्यातील एकूण 88 रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील 16 सरपंच आणि 72 सदस्य अशा एकूण 88 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. आज 7 एप्रिलपासून 13 एप्रिलपर्यंत मस्साजोगच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. संतोष देशमुख यांना श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडे मकोका न्यायालयात ही सुनावणीला वेग आला आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम कसा?

अर्ज दाखल – 7 ते 13 एप्रिल
अर्जाची छाननी – 15 एप्रिल
अर्ज मागे घेण्याची तारीख – 17 एप्रिल
मतदान – 28 एप्रिल
निकाल – 29 एप्रिल
दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर रिक्त झालेल्या या सरपंच पदासाठी आजपासून या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून मस्साजोगचा नवीन कारभारी कोण याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान संतोष देशमुख यांच्या कार्याचा सन्मान राखण्यासाठी इतर इच्छुकांनी अर्ज भरू नयेत आणि ही निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन गावकऱ्यांकडून केले जात आहे. येत्या दोन दिवसांत यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावच्या कारभार पदी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.