चोरी करायला आला चोरटा पण पहिल्या मजल्यावरून पडला ! हात पाय मोडले नागरीकांनी दिला पोलिसांच्या ताब्यात ….


Pune Crime : पुण्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. खून, मारामाऱ्या, घरफोड्या असे बरेच गुन्हे घडत आहेत. अशातच बालेवाडी भागातील एका सोसायटीतील सदनिकेत घरफोडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

यामध्ये सदनिकेत घरफोडी करण्यासाठी आलेला चोरटा पहिल्या मजल्यावरुन पडला. पंधरा ते वीस फुटावरुन चोरटा सोसायटीच्या आवारात पडल्याने जखमी झाला. चोरट्याला रहिवाशांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. चोरट्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, बप्पा सरकार (वय ३२, सध्या रा. मुंबई) असे जखमी झालेल्या चोरट्याचे नाव आहे.

दरम्यान,याबाबत एका रहिवाशाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार बालेवाडी भागातील इयॉन सोसायटीत राहायला असून सोसायटीत पहिल्या मजल्यावरील सदनिकेत ते राहायला आहेत. गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास सरकार सोसायटीच्या आवारात शिरला. सोसायटीतील पाइपच्या आधारे तो पहिल्या मजल्यावर असलेल्या सदनिकेतील गॅलरीत उतरला. आवाज झाल्याने तक्रारदार झोपेतून जागे झाले आणि त्यांनी गॅलरीतून डोकावून पाहिले.

तक्रारदार जागे झाल्याचे लक्षात येताच चोरटा पाइपवरुन उतरून पसार होण्याचा प्रयत्नात असताना तो पंधरा ते वीस फुटावरुन खाली कोसळला. सोसायटीच्या आवारात सरकार पडला. तक्रारदाराने सोसायटीतील रहिवाशांना जागे केले. रखवालदाराने सरकारला पकडून धरले.त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. जखमी अवस्थेतील सरकाराला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच पोलीस उपनिरीक्षक चाळले तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!