काळजी घ्या! पुढील तीन दिवस तापमानाचा पारा आणखी वाढणार..
पुणे : सध्या हवामान विभागाने नागरिकांना अलर्ट केले आहे. पुढील ३ दिवसात महाराष्ट्रासह देशात तापमानाचा पारा आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे बाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे.
विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत तापमान ४० अंश सेल्सियसपेक्षा जास्त आहे. तापमानात आणखीन वाढ झाल्यास उष्माघाताशी संबंधित आरोग्य तक्रारी वाढू शकतात.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्येही ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. हा आकडा अजून वाढू शकतो.
वर्धा येथे सर्वाधिक कमाल ४३ अंश सेल्सिअस आणि बुलढाणा येथे सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. अकोला येथे ४२.६ अंश सेल्सिअस, अमरावती ४२.६, बुलढाणा ३९.७, ब्रम्हपुरी ४१.२, चंद्रपूर ४२.४, गडचिरोली ४२, गोंदिया ४१.२ आणि नागपूर ४२.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.