सस्पेन्स संपला!मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी पहिल्यांदाच महिला विराजमान, कोण आहेत अश्विनी भिडे?


मुंबई : मुंबईच्या महापालिकेच्या आयुक्तपदी कोणाची नियुक्ती होणार याचा सस्पेन्स आता संपला आहे. ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांच्याकडे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा कारभार सोपवण्यात आला आहे. त्यांच्या रूपाने मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच महिला आयुक्त विराजमान होणार आहे.

बीएमसीच्या आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली पाहिजे, यावर चर्चा करण्यासाठी मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांची सोमवारी रात्री उशिरा बैठक झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते.या भेटीत आयुक्तपदासाठी अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

कोण आहेत अश्विनी भिडे?

अश्विनी भिडे या १९९५च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी आतापर्यंत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्या सध्या मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. यासह त्या मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारीही सांभाळत आहेत. त्यांच्या या कामकाजाची दखल घेत त्यांना ‘मेट्रो वूमन’ म्हणून ओळख मिळाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या कार्याचे वेळोवेळी कौतुक केले आहे. आता त्या मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदाचा कारभार सांभाळणार आहेत.

याआधी आयुक्तपदासाठी अश्विनी भिडे यांच्यासह मिलिंद म्हैसकर आणि असीम गुप्ता यांच्या नावाची चर्चा होती. नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांचे नाव उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पुढे केले होते. पण शेवटी ते मागे पडले. आणि मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू अश्विनी भिडे यांची आयुक्तपदी वर्णी लागली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!