सस्पेन्स संपला! बारामती पंचायत समितीच्या गटनेतेपदी बाबा चोरमलेंची नियुक्ती, सुनेत्रा पवारांची मोठी घोषणा..


बारामती : नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीनंतर सभापती,उपसभापती गटनेते पदांच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं.अशातच आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती पंचायत समितीच्या गटनेतेपदी पक्षाचे बाबा चोरमले यांची अधिकृत निवड जाहीर झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ही निवड केली आहे.

बारामती पंचायत समितीच्या बारा पैकी दहा जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत.मोरगाव पंचायत समिती गणातून विजयी झालेल्या बाबा चोरमले यांची बारामती पंचायत समितीच्या गटनेतेपदीच्या नियुक्तीची घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली आहे.निवडीनंतर प्रतिक्रिया देताना बाबा चोरमले यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, ही जबाबदारी सन्मानाची असून सर्व सदस्यांना सोबत घेऊन स्वर्गीय अजित पवार यांच्या विचारांची प्रेरणा जपत बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

बाबा चोरमले यांच्यावर गटनेता म्हणून पंचायत समिती सदस्यांमध्ये समन्वय साधणे, शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे आणि विकासकामांना गती देणे या जबाबदाऱ्या त्यांच्यावर असणार आहेत. विशेषतः शेतीपूरक उद्योग, पाणी व्यवस्थापन, ग्रामीण पायाभूत सुविधा, महिला बचतगटांचे सक्षमीकरण तसेच युवकांसाठी कौशल्याधारित रोजगारनिर्मिती यावर भर देण्याची अधिकची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आलेली आहे.

पळशी गावचे माजी सरपंच म्हणून बाबा चोरमले यांनी काम करताना गावच्या विकासास अधिक प्राधान्य दिले आहे.त्यांनी ग्रामविकासाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली होती. पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, शेतकरीहिताच्या उपक्रमांत त्यांनी पुढाकार घेतला होता. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख असून ग्रामीण भागातील नागरिकांशी त्यांचा थेट आणि विश्वासार्ह संवाद राहिला आहे.

गटनेतेपदी झालेल्या चोरमले यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तालुक्यातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होणार आहे. सर्वसामान्यांच्या हिताचे आणि ग्रामीण भागातील प्रश्नांना प्राधान्य देणारे नेतृत्व मिळाल्याने आगामी काळात विकासकामांना नवे बळ मिळेल आणि पक्षवाढीसही चालना मिळेल, असा विश्वास स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!