अवकाळीने बळीराजाला रडवलं! अवकाळीमुळे २२ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान..

पुणे : १ मे ते १४ मे या काळात अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे राज्यात २१ जिल्ह्यातील २२ हजार २३३ हेक्टरवरील पिकाला फटका बसला आहे. शेतात उभ्या असलेल्या पिकाचे अनोतान नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
साधारणपणे १ मेपासून सुरू झालेला अवकाळी पाऊस, वादळीवारे आणि गारपिटीमुळे केळी, आंबा, मका, संत्रा, धान, भाजीपाला, फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या पंचनामे सुरू आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात आकडा वाढण्याची शक्यता आहे.
राज्यात ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, पुणे, जळगाव, जालना, परभणी, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या २१ जिल्ह्यांमध्ये साधारणपणे १ मेपासून अवेळी पावसाला सुरुवात झाली.
सोबत वादळीवारे आणि गारपिटीमुळे या जिल्ह्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. केळी, जांभूळ, आंबा, भात, चिकू, बाजरी, मका, डाळिंब, कांदा, भाजीपाला, पपई, मूग, उडीद, ज्वारी, भुईमूग, संत्रा, धान तसेच फळपिकांचे नुकसान झाले आहे.
मदत आणि पुनर्वसन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, भातकुली, चांदूरबाजार, चिखलदरा तालुक्यातील तब्बल १० हजार ६३६ हेक्टर, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, जामनेर, रावेर, भडगाव, एरंडोल, मुक्ताईनगर, धरणगाव, बोदवड, पारोळा, अमळनेर तालुक्यातील ४ हजार ३९६ हेक्टर, जालना जिल्ह्यातील अंबड, मंठा, बदनापूर, परतूर, जालना तालुक्यातील १ हजार ६९५ हेक्टर, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, बागलाण,
त्रंबकेश्वर, सुरगाणा, मालेगाव, दिंडोरी तालुक्यात १ हजार ७३४ हेक्टर, पालघर जिल्ह्यातील पालघर, तलासरी, डहाणू, वाडा, विक्रमगड, वसई तालुक्यातील ७९६ हेक्टर, चंद्रपूर जिल्ह्यात १ हजार ३८ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, संपूर्ण राज्यभरात होत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका हा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसला असून उन्हाळी कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत एकीकडे मोठ्या प्रमाणावर उन्हाळी कांद्याची आवक होत असताना दुसरीकडे मात्र भाव चांगलेच घसरल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.