‘जीबीएस’मुळे मृत्यूची मालिका सुरुच, पुण्यात आणखी एक बळी, रुग्णसंख्या २०० पार, जाणून घ्या लक्षणं…

पुणे : राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे नुसार आतापर्यंत जीबीएसमुळे ८ जणांचा बळी गेला आहे. राज्यात जीबीएसच्या रुग्णांची संख्या दोनशे पार गेली आहे. तर आत्तापर्यंत १०९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

यातून ५४ रुग्णावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत, तर २० जण व्हेंटिलेटवर आहेत. गुलेन-बॅरी सिंड्रोम या मेंदूविषयक आजाराच्या रुग्णसंख्येने २००चा टप्पा ओलांडला आहे. जीबीएसची राज्यातील रुग्णसंख्या २०३ इतकी झाली आहे. यांपैकी १७९ रुग्णांची निदान निश्चिती करण्यात आली आहे.
बुधवारी (ता. १२) शहरात एका ५९ वर्षीय रुग्णाचा जीबीएसमुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. राज्यात एकूण ८ मृत्यूंची नोंद झाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, २०३ रुग्णांपैकी ९४ रुग्ण महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील आहेत.

तसेच, ४१ रुग्ण पुणे मनपा, २९ रुग्ण पिंपरी-चिंचवड मनपा, ३१ रुग्ण पुणे ग्रामीण हद्दीतील आणि ८ रुग्ण इतर जिल्ह्यांमधील आहेत. सध्या ५२ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून, २० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आत्तापर्यंत १०९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे
गुलेन-बॅरे सिंड्रोमची लक्षणे काय?
अचानक पायातील किंवा हातात येणारा अशक्तपणा / दुर्बलता / लकवा
अचानकपणे उद्भवलेला चालण्यातील त्रास किंवा अशक्तपणा
जास्त दिवसांचा अतिसार (डायरिया) आणि ताप
अशी घ्या काळजी..
पिण्याचे पाणी उकळून प्यावे
स्वच्छ व ताजे अन्न खावे
शिजलेले अन्न आणि न शिजलेले कच्चे अन्न एकत्रित ठेऊ नये
वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा
हात किंवा पायांमध्ये अचानक वाढत जाणारा अशक्तपणा असल्यास त्वरित जवळच्या महानगरपालिका रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधावा.