पहिल्या बायकोला वेळ देतो म्हणून दुसरी बायको चिडली अन्….पत्नीच्या धक्कादायक कृत्यानं सगळेच हादरले, काय घडलं?

नाशिक : नाशिकमधील आडगाव-सय्यद पिंप्री रस्त्यावरील एका वस्तीवर एका महिलेने तिच्या पतीचा खून केला आहे. पहिल्या बायकोकडे जास्त वेळ राहत असल्याच्या कारणावरुन या महिलेने भावाच्या साथीने हे कृत्य केले आहे.
या प्रकरणी महिलेसह तिच्या तीन भावांवर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेला पोलिसांनी अटक केली आहे तर अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
भावसार मूलचंद पवार ऊर्फ बाल्या असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, भावसार त्याची पहिली बायको निरमा आणि मुलगी यांना घेऊन नाशिकमधील आडगाव शिवारातील हिंदुस्थाननगर येथे राहणाऱ्या आई-वडिलांना भेटण्यासाठी आला होता. दरम्यान पहिल्या बायकोकडे जास्त वेळ असतो म्हणून भावसार आणि दुसरी बायको सुनीता यांच्यात वाद सुरु होता.
लग्नानंतर त्यांना मुलं होत नव्हते यावरुन त्यांच्यात भांडण सुरु झाले. सुनीताचे भाऊदेखील भांडणात सहभागी झाले. दिवसभर सुरु असलेला वाद वाढून हाणामारी सुरु झाली. सुनीता, तिचा भाऊ आणि अन्य दोन आरोपी मिळून भावसारला मारहाण करु लागले.
त्यांनी मिळून भावसारला पकडले आणि सुनीताच्या भावाने त्याच्या पोटावर, पाठीवर आणि छातीवर धारदार चाकूने वार केले. एकाने त्याच्या डोक्यात रॉड टाकली. रक्ताने माखलेला भावसार त्याच्या पहिल्या बायकोकडे गेला. पुढे त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.
दरम्यान, रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणाची माहिती मिळताच आडगाव पोलिसांनी मृताच्या दुसऱ्या बायकोला ताब्यात घेतले. अन्य आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची विविध पथक रवाना करण्यात आली आहेत.