खरात प्रकरणाची व्याप्ती वाढली! नामांकित वैद्यकीय डॉक्टर एसआयटीच्या रडारवर, तब्बल 5 तास कसून चौकशी

नाशिक : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातच्या काळ्या कारन्याम्याची व्याप्ती अधिकच वाढतच चालली आहे. राजकीय नेत्यांनंतर आता त्यांच्या कारनाम्याचे धागेदोरे नाशिकमधील नामांकित वैद्यकीय क्षेत्रापर्यंत पोहोचले आहेत. याप्रकरणी नामांकित डॉक्टरांची तब्बल पाच तास कसून चौकशी करण्यात आली. या कारवाईमुळे नाशिकच्या वैद्यकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, एसआयटीने संबंधित डॉक्टरांना खरातसोबतच्या आर्थिक संबंधांबाबत अधिक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. प्रामुख्याने, या डॉक्टरांनी खरातच्या बेकायदेशीर व्यवसायात मोठी आर्थिक गुंतवणूक केली आहे का? वैद्यकीय व्यवसायाच्या आडून काही अवैध व्यवहार सुरू होते का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अशोक खरात या डॉक्टरांच्या नावाचा वापर स्वतःसाठी संरक्षण म्हणून करत होता का? या मुद्द्यांवर पोलिसांनी माहिती जमा केली आहे.
दरम्यान खरात प्रकरणानंतर एसआयटीने कसून चौकशी सुरू केली आहे. खरातकडून लैंगिक आर्थिक शोषण झालेल्या पीडितांची माहिती घेतली जात आहे. तर, दुसऱ्या बाजूला खरातच्या या कृत्यात साथ देणाऱ्यांविरोधातही कारवाईचा फास आवळला जात आहे. त्यामुळे यातून आणखीन काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

खरातच्या ‘कॅनडा कॉर्नर’ येथील कार्यालयात केवळ सामान्य महिलाच नाही, तर प्रशासनातील उच्चपदस्थ महिला अधिकारी आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या पत्नींनाही लक्ष्य केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणातील काही पीडितांना विश्वासात घेतल्यानंतर त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.